पुणे : पुण्याचे शिवसेना महानगरप्रमुख आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात रवींद्र धंगेकर यांनी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करावा आणि मुरलीधर मोहोळ यांचा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे.  याशिवाय रवींद्र धंगेकर यांनी  27 ऑक्टोबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे.

Continues below advertisement


रवींद्र धंगेकर यांचे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र


रवींद्र धंगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहित खासदार मुरलीधर मोहोळ यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे. पुण्यातील जैन बोर्डिंग च्या मालमत्तेचा बेकायदा व्यवहार रद्द करण्याचे आदेश देण्यात यावे तसेच बेकायदा व्यवहारातील सूत्रधार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्यावा अशी केली मागणी धंगेकर यांनी केली आहे.  रवींद्र धंगेकर यांनी या पत्राची एक प्रत केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवण्यात आली आहे.


रवींद्र धंगेकर यांची एक्स पोस्ट जशीच्या तशी 


तमाम पुणेकरांना मी एका गोष्टीची माहिती देऊ इच्छितो, आज आपल्या सर्वांच्या वतीने मी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द व्हावा व प्रकरणाची कठोर चौकशी व्हावी, यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे विनंती करत आहे. तसेच 27 ऑक्टोबर 2025 पासून हा व्यवहार रद्द होईपर्यंत मी तमाम पुणेकरांसह जैन बोर्डींग येथे बेमुदत धरणे आंदोलनास बसत आहे.


आजपर्यंतच्या गेल्या अठरा दिवसांच्या संपूर्ण संघर्षात माझ्यासह अनेक लोकांनी, अनेक वेळा या गोष्टीचे प्रत्यक्ष प्रत्यक्ष पुरावे दिले की, व्यवहारातील सर्वच व्यक्ती व संस्था या श्री.मुरलीधर मोहोळ यांच्या संबंधित आहेत. आज मी या पत्र्यामध्ये देखील आपल्या सर्वांच्या माहितीसाठी या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम देत आहेत.


जैन बोर्डिंग चा व्यवहार रद्द होण्याबरोबरच समाजातील मंदिरे व देवस्थानच्या जागा हडप करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी या प्रकरणाची निपक्ष:पाती चौकशी होणे गरजेचे आहे. ही मी निपक्ष:पाती चौकशी तेव्हा शक्य आहे जेव्हा सदर प्रकरणातील मुरलीधर मोहोळ हे आपल्या पदाचा राजीनामा देतील. कारण त्यांच्या केंद्रीय मंत्रीपदाच्या प्रभावाखालीच हा इतका मोठा गैरव्यवहार घडला आहे. त्यामुळे ही चौकशी होत असताना देखील त्यांनी मंत्रीपदावर राहणे योग्य नाही.त्यामुळे मी आज मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. 


आज माननीय पंतप्रधानांसह ,देशाचे गृह तथा सहकारमंत्री, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना देखील आपण या पत्राच्या प्रती पाठवत आहोत.त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून तातडीने हा व्यवहार आपल्या विशेष अधिकारातून रद्द करावा व या प्रकरणाची कठोर चौकशी होईपर्यंत श्री. मुरलीधर मोहोळ यांचा राज्यमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा ,अशी मागणी मी करत आहे