मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. भारत निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही. मात्र, राजकीय नेत्यांची पक्षांतरं सुरु झालेली आहेत.महायुतीच्या घटक पक्षांतील नेते महाविकास आघाडीत जात असल्याचं पाहायला मिळत आहे. डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला खिंडार पडणार आहे. शिंदेंच्या युवासेनेचे सचिव दीपेश म्हात्रे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत.  


डोंबिवलीतील युवा सेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण सोडून ठाकरेंची मशाल हाती घेणार आहेत.दीपेश म्हात्रे आपल्यासोबत कल्याण डोंबिवली महापालिकेमधील चार माजी  नगरसेवकांसह आणि पदाधिकाऱ्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.


आज दुपारी साडेबारा वाजता मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दीपेश म्हात्रे  हे प्रवेश करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दीपेश म्हात्रे आणि चार माजी नगरसेवकांचा प्रवेश ठाकरेंसाठी दिलासादायक ठरणार आहे. 


शिवसेनेतल्या पक्ष फुटी नंतर  शिवसेनेचा युवा चेहरा असलेले  दीपेश म्हात्रे हे शिंदें सोबत गेले होते, युवा सेना सचिव पदी ते शिंदे यांच्या शिवसेनेत काम करत होते.  मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेतील हा युवा चेहरा ठाकरेंकडे येत असल्याचा पाहायला मिळत आहे. 


दीपेश म्हात्रेंची विधानसभेसाठी तयारी


डोंबिवली विधानसभा मतदारसंघासाठी दीपेश म्हात्रे तयारी करत असून ते इच्छुक उमेदवार असल्याचं सांगण्यात येत आहे.  त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांना डोंबिवलीतून उमेदवारी मिळते का ? हे सुद्धा पहावं लागेल. उद्धव ठाकरे दीपेश म्हात्रे यांना विधानसभा निवडणुकीत संधी देणार का हे देखील पाहावं लागेल.  


डोंबिवली मध्ये महायुतीत  शिवसेना आणि भाजपमध्ये मागील काही दिवसांपासून तणाव वाढलेला पाहायला मिळत होता. त्या दरम्यान दीपेश म्हात्रे यांना काही दिवसांपूर्वी अज्ञातांकडून धमक्या येत होत्या.  त्यामुळे स्थानिक पातळीवर महायुतीतील वाढलेला तणाव त्यासोबत सध्याची राजकीय परिस्थिती याचा विचार करून दीपेश म्हात्रे हे शिंदे यांची शिवसेना सोडून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे बोललं जात आहे. 


ठाकरेंकडे देखील इनकमिंग सुरु


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात देखील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इनकमिंग सुरु झालेलं आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्याकडे भाजपला सोडचिठ्ठी देत हर्षवर्धन पाटील प्रवेश करणार आहेत. त्यामुळं राज्यात सध्या मविआकडे इनकमिंग वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.


इतर बातम्या :


Bacchu Kadu : आमदार राजकुमार पटेल प्रहारची साथ सोडणार? ग्राफिक्सवरुन बच्चू कडूंचं नाव अन् फोटो गायब, सत्ताधारी पक्षात जाण्याचे संकेत


Rajeev Patil: हितेंद्र ठाकूरांच्या बविआला खिंडार पडणार? राजीव पाटील भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढण्याची शक्यता