अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu), महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे नेते छत्रपती संभाजीराजे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह इतर छोट्या पक्षांनी एकत्र येत परिवर्तन महाशक्ती आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीनं स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. आमदार बच्चू कडू हे परिवर्तन महाशक्तीमध्ये सक्रीय झालेले असताना त्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मेळघाटातील आमदार राजकुमार पटेल (Rajkumar Patel) यांनी बॅटला रामराम करत हातात धनुष्यबाण घेण्याचे संकेत दिले आहेत. राजकुमार पटेल यांच्या बैठकीचं एक पोस्टर व्हायरल होतं आहे त्यामध्ये बच्चू कडू यांचा फोटो आणि पक्षाचं नाव देखील दिसत नसल्यानं येत्या काळात बच्चू कडूंना मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 


बच्चू कडूंचा फोटो गायब, एकनाथ शिंदेंना स्थान 


प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांच्या एका ग्राफिक्स बॅनरवरुन बच्चू कडूंचा फोटो गायब झाल्याचं पाहायला मिळालं आहे. राजकुमार पटेल यांच्या ग्राफिक्स बॅनरवरुन बच्चू कडू यांच्या ऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो पाहायला मिळत आहे. राजकुमार पटेल हे अमरावतीच्या धारणी (मेळघाट) विधानसभेचे आमदार आहेत. 6 ऑक्टोबरला कार्यकर्त्याच्या संवाद बैठकीसाठी व्हायरल होत असलेल्या ग्राफिक्स बॅनरवर  प्रहारचं नाव आणि आमदार बच्चू कडूंचा फोटो गायब झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून राजकुमार पटेल यांना विधानसभेसाठी मोठा शब्द मिळाला असल्याची चर्चा आहे. त्यामुळं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडूंना धक्का बसणार का?  प्रहार मधून आमदार राजकुमार पटेल बाहेर पडणार का? या चर्चांना जिल्ह्यात उधाण आलं आहे. 



बच्चू कडू परिवर्तन महाशक्ती आघाडीत,  आमदार धनुष्यबाण हाती घेणार?


2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रहारचे दोन आमदार निवडून आले होते. बच्चू कडू आणि राजकुमार पटेल यांनी सुरुवातीला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेला पाठिंबा देत महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बच्चू कडू राज्यमंत्री होते. जून 2022 मध्ये बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली. ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी बच्चू कडूंच्या प्रहारनं महायुती सरकारच्या बाजूनं मतदान केलं.   


लोकसभा निवडणुकीत बच्चूकडू यांनी महायुतीच्या भाजपच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार दिला होता. नवनीत राणा यांना त्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. आता बच्चू कडू यांनी महायुतीची साथ सोडत परिवर्तन महाशक्ती नावानं आघाडी स्थापन केली आहे. बच्चू कडू यांना महायुतीतील शिवसेनेकडून मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राजकुमार पटेल प्रहारची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार का हे पाहावं लागेल. 


इतर बातम्या :