पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रत्येक पक्ष जमेल त्या मार्गाने आपले बळ वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय. सत्ताधारी महायुती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) आपल्या सोबत घेण्याचा प्रयत्न करतेय. अगदी तसाच प्रयत्न विरोधी बाकावरील महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) केला जातोय. मराठवाड्यात प्रभाव असलेल्या शिवसंग्राम (Shivsangram) या पक्षाच्या नेत्या ज्योती मेटे (Jyoti Mete) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  


ज्योती मेटे यांच्या प्रवेशासाठी प्रयत्न


मिळालेल्या माहितीनुसार शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांची पुणे महानगरपालिका भागात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पाडली. या बैठकीत शिवसंग्रामाच्या नेत्यांत महाविकास आघाडीत सामील होण्यावर चर्चा झाली आहे. या बैठकीत  शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळी मतं मांडली आहेत.


थेट राष्ट्रवादीत प्रवेश करू नये, कार्यकर्त्यांची भावना 


शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसा प्रस्तावही शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दिलाय. मात्र शिवसंग्रामचे कार्यकर्ते आपण महाविकास आघाडीचा भाग म्हणून सहभागी झाले पाहिजे असा आग्रह धरत आहेत. त्यामुळे नेमकं काय घडणार? असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. 


शिवसंग्रामलाही जागा दिल्या जाणार का?


ज्योती मेटे यांनी थेट राष्ट्रवादीत प्रवेश न करता महाविकास आघाडीचा मित्रपक्ष म्हणून काम करावे, असे शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. असे झाल्यास महायुतीमध्ये शिवसंग्रामला काही जागा मिळणार का? शिवसंग्रामला जागा देण्याचे ठरल्यास त्यांची संख्या किती असेल? या जागा कोणत्या असतील, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.   


वंचितच्या समावेशासाठी प्रयत्न 


वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रात मोठी ताकद आहे. त्यामुळे वंचितच्याही समावेशासाठी महायुतीच्या घटकपक्षांकडून प्रयत्न चालू आहेत. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मात्र आम्ही अद्याप महाविकास आघाडाचा भाग झालेलो नाहीत, असं स्पष्टीकरण अनेकदा दिलंय. वंचितने ऐनवेळी आपली वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतल्यास महाविकास आघाडीच्या घटकपक्षांना चांगलाच फटका बसू शकतो. त्यामुळे मविआ आणि वंचित यांच्यात काय तोडगा निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


मनसेच्या समावेशासाठी महायुतीकडून प्रयत्न


दुसरीकडे सत्ताधारी महायुतीदेखील आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. भाजपाकडून मनसेला महायुतीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना दिल्लीत बोलावण्यात आले होते. तेथे राज ठाकरे आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांची बैठक झाली. या बैठकीत भाजपाने मनसेला एक जागा देण्यावर सहमती दाखवल्याचे म्हटले जात आहे. मनसेला मात्र दोन जागा हव्या आहेत. त्यामुळे मनसे आणि भाजपा यांचीही चर्चा फिस्कटणार का? असे विचारले जातेय.