Shivadi Assembly constituency : शिवडी विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अजय चौधरींना उमेदवारी दिल्यानंतर आज (दि.25) सुधीर साळवी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लालबागमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे. "मी कालही पक्षासोबत होतो, आजही आहे आणि उद्याही पक्षासोबत राहणार", असं सुधीर साळवी म्हणाले आहेत.
शिवडी विधानसभेच्या जागेवरुन उमेदवारी नाकारल्यानंतर सुधीर साळवी आणि उद्धव ठाकरेंमध्ये मातोश्री निवासस्थानी वन टू वन बैठक पार पडली. शिवडी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार अजय चौधरी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराज झालेल्या सुधीर साळवींना उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावले होते. दरम्यान, मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंकडून सुधीर साळवींच्या दिलजमाईचे प्रयत्न करण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे आणि सुधीर साळवींमध्ये 10 मिनीटं चर्चा झाली.
काही वेळापूर्वी उद्धव ठाकरेंनी सुधीर साळवींना फोन करत मातोश्रीवर बोलावले होते. त्यानंतर सुधीर साळवी मातोश्रीवर आले. उद्धव ठाकरे आणि साळवींवर मातोश्रीवर चर्चा देखील झाली. यावेळी खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते. शिवडी विधानसभेतून तिकिट न दिल्याने साळवी समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान, सुधीर साळवी लालबाग येथील मेळाव्यात शिवडी विधानसभेबाबत महत्वाचा निर्णय जाहीर करतील, असे बोलले जात आहे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, सुधीर साळवी आमच्या घरातला मुलगा आहे. राग रुसवे होऊ शकतात. तो नाराज नाही आणि नाराज नव्हताच. सुधीर सकाळीच क्लिअर झाला होता तो व्यवस्थित काम करून ही शीट जिंकून आणेल. सुधीर साहेबांच्या जवळचा मुलगा आहे. काही प्रॉब्लेम नाही.
माजी खासदार विनायक राऊत म्हणाले, सुधीर साळवी हे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. त्यांनी उद्धव साहेबांना येऊन शब्द दिलेला आहे. मी शिवसैनिक आहे शिवसैनिकांची कर्तव्य शंभर टक्के पूर्ण करणार आणि मशालचा आमदार मातोश्रीवर घेऊन येणार अशा पद्धतीचा शब्द त्यांनी दिलेला आहे. साहजिकच ते इच्छुक होते. त्यांना पण आमदारकी मिळाली पाहिजे असे स्वप्न पाहणे किंवा इच्छा व्यक्त करणे चूक नाही. सुधीर साळवींसारखा निष्ठावंत शिवसैनिक तेवढ्याच ताकतीने ज्यांना उमेदवारी अजय चौधरींना दिली आहे. त्यांना निवडून आणण्याचा निश्चय केलेला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या