Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. यानंतर महाविकास आघाडीतील धुसफूस समोर येत आहे. नुकताच काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला. यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटाला टोला लगावला. यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र मैदानात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे.
लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) महाराष्ट्रात महायुतीचा (Mahayuti) दारूण पराभव झाला तर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) भरघोस यश मिळाले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने अनपेक्षित बहुमत मिळवत आपली सत्ता कायम टिकवली आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले. तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसल्याचे दिसून आले. यानंतर नितीन राऊत (Nitin Raut) यांनी मविआला टोला लगावला. लोकसभेनंतर आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या केल्या, असे म्हणत त्यांनी मविआला घरचा आहेर दिला. तर अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होत नाही अन् शिवसेनेला अजून जाग येत नाही, असे म्हणत मित्रपक्षांवर निशाण साधला. यानंतर संजय राऊत यांनी आगामी निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे.
नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार : संजय राऊत
संजय राऊत म्हणाले की, नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहे. एकदा आम्हाला पाहायचे आहेच, जे काही होईल ते होईल, आमचं असं ठरतंय. मुंबई, ठाणे नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार? कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी घोषणा त्यांनी केली आहे. संजय राऊत यांच्या घोषणेनंतर आता महाविकास आघाडीतील मित्रपक्ष नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
चर्चा करुन निर्णय घ्यायला हवा : जितेंद्र आव्हाड
संजय राऊत यांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. ठाकरे गटाचा निर्णय झाला असेल तर थांबवणारे आम्ही कोण? राऊतांनी चर्चा करुन निर्णय घ्यायला हवा होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी संजय राऊत यांच्या स्वबळाच्या नाऱ्यावर दिली आहे.
आणखी वाचा