नाशिक : काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मधुकर जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश करत ठाकरे गटाला धक्का दिला होता. शुक्रवारी शिंदे गटाने काँग्रेससह राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का दिला. काँग्रेसचे माजी नगरसेवक जॉय कांबळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका सुषमा पगारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. यावेळी खा. नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते विजय करंजकर, उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, सहसंपर्कप्रमुख राजू लवटे, शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, योगेश म्हस्के, संजय तुंगार यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाने चांगली कामगिरी करत क्रमांक दोनचा पक्ष बनला आहे. शिंदेसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रिपद आले नसले तरी त्यांच्या पक्षाकडे इनकमिंग वाढू लागली आहे. नाशिकमध्ये शिंदेसेना वर्चस्व वाढवण्यासाठी कामाला लागली असून, ठाकरे गटासोबतच इतर पक्षांतील माजी नगरसेवकांकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे पुढच्या काही शिंदेसेनेत आणखी प्रवेश होण्याची शक्यता आहे. आगामी महापालिकेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात इनकमिंग सुरू झाली आहे.
शिंदेंचा काँग्रेस, राष्ट्रवादीला दे धक्का
शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा नुकताच शिवसेना पक्षाच्या वतीने भव्य सत्कार केला असता यावेळी त्यांनी शहर व जिल्ह्यात पक्ष वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी दुसऱ्या पक्षातील नेत्यांना प्रवेश द्यावे लागणार आहेत. मात्र, निष्ठावानांना विचारात घेऊनच प्रवेश दिले जातील, असे म्हटले होते. त्यांच्या या विधानाची शिंदेसेनेत चांगलीच चर्चा रंगली होती. दरम्यान, जॉय कांबळे हे काँग्रेसचे दिवंगत नेते माजी नगरसेवक उत्तम कांचळे यांचे सुपुत्र असून, कॉलेजरोड, कॅनडा कॉर्नर, शरणपूर रोड, विसे मळा या परिसरातून ते निवडून येतात. त्यांच्या शिंदे प्रवेशाने काँग्रेसला धक्का बसला आहे. तर राष्ट्रवादीच्या सुषमा पगारे या उपनगरमधून गेल्या वेळेस निवडून आल्या होत्या, त्यांनीही कांबळे यांच्या सोबत शिंदेसेनेत प्रवेश केला आहे.
महाराष्ट्रात शिवसेनेची लाट : अजय बोरस्ते
दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेची लाट आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी लोकाभिमुख केलेली कामे, घेतलेले निर्णय सर्वांना भावले आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षातील पदाधिकाऱ्याला वाटते आहे की, आपण सेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करावे. केवळ उबाठाच नव्हे तर तर काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे या पक्षांतील अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी शिवसेनेत येण्यासाठी इच्छुक आहेत. या प्रवेशाने त्याचा श्रीगणेशा झाला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली आहे.
आणखी वाचा