Girish Mahajan : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. यंदाच्या निवडणुकीत भाजप (BJP) 132 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी आता महायुतीत जाण्याची चाचपणी सुरू केल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील (Shiv Sena UBT) एका पदाधिकाऱ्याने भाजप नेत्यांची भेट घेऊन प्रवेशाची तयारी दाखवल्याची माहिती मिळत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 


राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाल्यानंतर पुढील पाच वर्षे महायुतीचेच सरकार राहणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील काही पदाधिकाऱ्यांच्या महायुतीशी जुळवून घेण्याच्या हालचाली सुरु असल्याचे बोलले जात आहे.   


ठाकरेंचा बडा नेता भाजप संकटमोचकांच्या भेटीला


या पार्श्वभूमीवर नाशिकमधील (Nashik News) शिवसेना ठाकरे गटातील एका पदाधिकाऱ्याने जलसंपदा मंत्री आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची भेट घेऊन त्यांना मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. मात्र, शुभेच्छा देतानाच या पदाधिकाऱ्याने त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, स्थानिक आमदारांच्या व माजी नगरसेवकांच्या विरोधानंतर कोणाचाही प्रवेश होणार नसल्याचे प्रदेश पातळीवरील नेत्यांनी स्पष्ट केले आहे. 


नाशिकमध्ये महायुतीचा मोठा विजय


दरम्यान, नाशिक जिल्ह्यात महायुतीचा मोठा विजय झाल्याचे दिसून आले. नाशिक जिल्ह्यातील 15 मतदारसंघांपैकी तब्बल 14 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही विधानसभा निवडणुकीसारखेच चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील काही पदाधिकारी महायुतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असून आता महाविकास आघाडीतील पदाधिकारी महायुतीत प्रवेश करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


महाजनांचा जळगावच्या पालकमंत्रिपदावर दावा


राज्यभरामध्ये पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच जोरात सुरू असताना आता जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये चुरस निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. आता जळगावचे पालकमंत्रीपद कुणाला मिळणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Raksha Khadse : नाथाभाऊ अन् गिरीश महाजनांमध्ये विधानपरिषदेत खडाजंगी, आता रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, दोघांना एकत्र आणण्यासाठी...


Maharashtra Cabinet Portfolio : अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर