Uddhav Thackeray मुंबई: मुंबईत शिवसेना ठाकरे गटाकडून ‘शिव सर्वेक्षण यात्रा’ सुरू करण्यात आली होती. मुंबईतील 36 विधानसभा क्षेत्रांसाठी नेमलेल्या निरीक्षकांनी आपला अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिला असून, जानेवारीपासून उद्धव ठाकरे मुंबईतील सर्व शाखांना भेट देऊन शाखाप्रमुखांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेणार आहेत. 26 तारखेपासून ठाकरे गटाच्या मातोश्रीवर बैठकांचे सत्र सुरु होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थित ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक होणार आहे.


आगामी 26 डिसेंबर, 27,28 आणि 29 डिसेंबरला विधानसभा निहाय बैठका होणार असून स्वतः उद्धव ठाकरे बैठकीच्या माध्यमातून आढावा घेणार आहेत. 21 डिसेंबर रोजी मुंबईतील निरीक्षकांची बैठक पार पडली होती. त्यानंतर आता पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येणार आहे. विधानसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर मुंबईत विधानसभा निहाय निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी वार्डनिहाय शाखाप्रमुख ते विभागप्रमुखांशी बातचीत केली होती. त्यानंतर या निरीक्षकांनी अहवाल उद्धव ठाकरे यांच्याकडे 21 तारखेच्या बैठकीत सादर केला होता.


उद्धव ठाकरे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बातचीत करणार-


आगामी मुंबई महानगर पालिका ठाकरे गटाने स्वबळा लढावी असं पदाधिकाऱ्यांच म्हणणं आहे, यासाठी उद्धव ठाकरे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बातचीत करणार आहेत. या बैठकीसाठी विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश मातोश्रीवरुन देण्यात आले आहेत. या बैठकीत महानगरपालिकेच्या तयारीचा आढावा तसेच जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या शाखा भेटीचे आयोजन करण्यासंदर्भात देखील चर्चा करण्यात येणार आहे.


पदाधिकारी आढावा बैठक-


26 डिसेंबर - बोरिवली विधानसभा , दहिसर विधानसभा , मागाठाणे विधानसभा, दिंडोशी, चारकोप, कांदिवली आणि मालाड विधानसभा 


27 डिसेंबर -अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, विलेपार्ले, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, चांदिवली, कुर्ला, कलिना विधानसभा 


28 डिसेंबर -मुलुंड, विक्रोळी, भांडुप, मानखुर्द - शिवाजीनगर, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, अनुशक्तीनगर, चेंबूर, सायन कोळीवाडा 


29 डिसेंबर - धारावी, वडाळा, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा


35 प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या आरीफचा मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून सन्मान-


नीलकमल बोट दुर्घटनेत स्वतःचा जीव धोक्यात घालून ३५ प्रवाशांचे प्राण वाचवणारे आरीफ बामणे याचा काल मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आरीफने दाखवलेले प्रसंगावधान, धाडस आणि शौर्याचे कौतुक केले. यावेळी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार मनोज जामसुतकर उपस्थित होते.गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल बोटीला नौदलाच्या स्पीडबोटीने धडक दिल्याने भीषण दुर्घटना घडली होती. त्यात दोन्ही बोटींना जलसमाधी मिळाली.या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला तर 100 जणांना वाचवण्यात यश आले. यावेळी देवदूत ठरलेल्या आरीफ बामणे याचे सर्वत्र कौतुक होत असून उद्धव ठाकरे यांनी आरिफचा काल खास गौरव केला.


बोट दुर्घटनेत 35 जणांचे प्राण वाचवणाऱ्या आरीफ बामणेंचा उद्धव ठाकरेंनी केला सत्कार, VIDEO:



संबंधित बातमी:


मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले 'देवदूत', उद्धव ठाकरेंकडून विशेष कौतुक, मातोश्रीवर केला सन्मान