मुंबई: राज्यातील लोकसभा निवडणुकीचे पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडत आहे. यानंतर  राजकीय वर्तुळाला साहजिकच 4 जूनच्या निकालाचे वेध लागली. मात्र, त्यापूर्वी भाजपचे (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. कंबोज यांनी ट्विट करुन महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.


मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 4 जून रोजी लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आणखी एक फूट पडले. दोन्ही पक्षांमधून आमदार, नेते आणि कार्यकर्ते राजीनामा देऊन बाहेर पडतील. हे सर्वजण सध्या इतर पक्षांच्या संपर्कात आहेत, असा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर खरोखरच ठाकरे गट आणि शरद पवार गटातील उर्वरित आमदार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवारांची साथ सोडून सत्ताधारी गटात सामील होणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल. आता मोहित कंबोज यांच्या या दाव्यानंतर शरद पवार गट आणि ठाकरे गट काय प्रतिक्रिया देणार, याकडेही सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 




5 जूनला अर्धा भाजप पक्ष फुटेल: उद्धव ठाकरे


उद्धव ठाकरे यांनी बुधवारी नाशिकच्या सभेत भाजपवर आगपाखड केली होती. माझी मला चिंता नाही. मला तुमच्या आशीवार्दाचं कवच आहे, तोपर्यंत मला कोणाचीही भीती नाही. मोदीजी तुम्ही तुमच्या भाजपची चिंता करा. ज्यावेळी तुम्ही  आम्हाला विचारता इंडिया आघाडीकडे चेहरे किती आहेत, दरवर्षी आम्ही एक पंतप्रधान देऊ, असे तुम्ही म्हणता. अहो निदान आमच्याकडे चेहरे आहेत, तुमच्याकडे चेहराच नाही. तुम्ही पंतप्रधान नसाल  तर दोन वर्षांमध्ये भाजपची हालत काय होते, ते बघा. 5 तारखेलाचा अर्धा भाजप पक्ष फुटल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही सगळे गद्दार जमवले आहेत,  सत्ता आल्यावर सगळी यंत्रणा आमच्या हातात असेल, मग आम्ही या गद्दारांच्या शेपट्या कशा पकडतो, बघा तुम्ही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या सभेत केली होती.


आणखी वाचा


मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, भाजप एकसंध आहे की नाही हे 4 जूननंतर कळेल: संजय राऊत


भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत