मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. थोड्याच दिवसात आचारसंहिता लागणार असून महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विधानसभेसाठी जोरदार तयारी करत आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे गेल्या काही दिवसांपासून वारंवार महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. पी एम मोदींच्या दौऱ्यावरून शिवसेना ठाकरे गटाने (Shiv sena UBT) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार प्रहार केलाय.  


ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) भाजपला (BJP) फटका बसल्यानंतर आता भाजप अलर्ट मोडवर आलाय.  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात यश मिळणे त्यांना आता कठीण वाटत आहे. फडणवीस यांची नकारात्मक भाजपला बुडवेल की काय? असं त्यांना वाटतं आहे. 


आता फडणवीसांवर विश्वास टाकू शकत नाही


देवेंद्र फडणवीस यांच्यावर जसा विश्वास 2014 आणि 2019 मध्ये टाकला तसा आता टाकू शकत नाही. त्यामुळे स्वत: प्रचार जातीने पाहावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष द्यावं लागतं आहे. पंतप्रधान मोदींना सातत्याने राज्यात यावं लागतंय. याकडे आम्ही सकारात्मकरित्या बघत आहोत, अशी टीका त्यांनी केली आहे.  


मोठेपणा मिरवायचा असेल तर मराठी शाळा वाचवा


केंद्र सरकारने मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सुषमा अंधारे म्हणाल्या की, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सह्यांची मोहीम राबवली होती.  राष्ट्रपतींना यासंदर्भात सह्या दिल्या होत्या.  शिवसेनेच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. सरकारकडून काय अपेक्षा आहे.  अभिजात भाषा सरकारमध्ये आहात म्हणून करावी लागली.  मोठेपणा मिरवायचा असेल तर मराठी शाळा वाचवा. त्या अदानींच्या घशात जाऊ देऊ नका, असा हल्लबोल त्यांनी राज्य सरकारवर केला आहे. 


गृहमंत्री घोषणा अन् जाहिरातबाजीत व्यस्त


तर पुण्यातील अत्याचाराच्या घटनांवरून सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की,  गेल्या 48 तासात पुण्यात तीन महिला अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. गेल्या 7 महिन्यात 265 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. विनयभंगाचे 700 गुन्हे घडत असेल तर पुण्याला संस्कृतीचे माहेरघर डागळण्यात कोण जबाबदार आहे? पोलीस प्रशासन बातम्या कव्हर करु देत नाही. पोलीस प्रशासनावर प्रश्न चिन्ह उपस्थित होतात.  ललित पाटील असेल, ड्र्गजचे साठे असेल, आंधळकर प्रकरण असेल अशा अनेक घटना घडत आहेत.  पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था खराब झाली आहे.  गृहमंत्र्यांना त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, ते सध्या घोषणा आणि जाहिरातबाजीमध्ये व्यस्त आहेत.  त्यामुळे आता आमचं रक्षण आई अंबाबाईच करेल, असे त्यांनी म्हटले आहे.


आणखी वाचा 


Rahul Gandhi in Kolhapur: शिवरायांचा राज्याभिषेक रोखणारी विचारधारा, नियत खोटी असल्याने राजकोट किल्ल्यावरचा पुतळा पडला: राहुल गांधी