Sanjay Raut Press Conference : मुंबई : ज्या देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) अपमानित करून अर्धवट उपमुख्यमंत्री ठेवलं, त्यांना शिवसेनेचं (Shiv Sena) राम मंदिरात (Ram Mandir) योगदान काय? हा प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही, असं म्हणत संजय राऊतांनी (Sanjay Raut) टोला लगावला आहे. ठाकरे कुटुंबियांची (Thackeray Family), शिवसेना नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे, त्यांना काही झालं तर केंद्र सरकार (Central Government) जबाबदार असेल, मातोश्रीची जबाबदारी केंद्रसरकारची आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. 


मुंबईत वरळी डोममध्ये उद्या उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंसोबत कायदेतज्ज्ञही असतील. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालावर उद्याच्या पत्रकार परिषदेत खुली चर्चा होईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच, ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्र सरकारची असून महाराष्ट्रात डाऊटफुल्ल सरकार आहे, त्यांची नाही, असं स्पष्ट वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. अयोध्येतील भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी ज्यांना ज्यांना बोलावलं आहे, त्यांनी सर्वांनी गेलं पाहिजे, असंही संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे. 


मातोश्रीबाहेर मोठी घटना घडण्याची शक्यता आहे, असा फोन महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला, याबाबतही संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. संजय राऊत म्हणाले की, "फोन करणारे कोणते तरुण होते, हे मला माहिती आहे. राम मंदिर उडवून देण्याची धमकी देणारे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते होते. त्यांनी मुस्लिम नावं घेतली होती आणि राम मंदिर उडवून देण्याची धमकी दिली होती. या देशात लोकसभा निवडणुकीपूर्वी अशाप्रकारे धार्मिक तेढ निर्माण करुन निवडणुका जिंकायच्या किंवा निवडणुकांना सामोरं जायचं. हे भाजपचं षडयंत्र आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्र सरकारची. महाराष्ट्रात डाऊटफुल्ल सरकार आहे, त्यांची नाही. महाराष्ट्रातील सरकार सूडानं पेटलेलं सरकार. ही जबाबदारी केंद्र सरकारची, ज्या पद्धतीनं ठाकरे कुटुंबाचं संरक्षण, शिवसेना नेत्यांचं संरक्षण काढून घेतलं आहे. त्यामुळे भविष्यात काही घडलं, तर याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकार आणि महाराष्ट्राच्या गृहखात्याची आहे."


उद्या दुपारी 4 वाजता ठाकरेंची महापरिषद : संजय राऊत 


"उद्या दुपारी चार वाजता, वरळी डोम येथे उद्धव ठाकरे आणि काही कायदेपंडित यांची महापत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. देशभरातील पत्रकारांना आम्ही आमंत्रित केलं आहे. त्यांच्यासमोर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अपात्रता प्रकरणी निकाल दिला आहे. यावर खुली चर्चा होईल.", अशी माहिती संजय राऊतांनी दिली. 


पाकिस्तानसोबतचे भांडणाचे मुद्दे संपल्यामुळे केंद्र सरकार मालदीवसोबत भांडतंय : संजय राऊत 


"आता पाकिस्तानसोबत भांडण्याचा मुद्दा संपला आहे, त्यामुळे निवडणुकीपूर्वी आपलं केंद्र सरकार मालदीवसोबत भांडत आहे. मालदीवसोबत ज्यांच्याकडे स्वतःचं सैन्य नाही, त्यांच्यासोबत हे भांडणार आणि इथे मतं मागणार. मालदीवमध्ये चीन घुसलंय. म्यानमार आणि चीनचे सगळे उग्रवादी मणिपूरमध्ये घुसले आहेत, त्यांना आधी बाहेर काढा."


डिस्प्युटेड प्रॉपर्टी अजूनही तशीच, मंदिर तीन किमी अंतरावर बनलंय : संजय राऊत 


"राम भाजपची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, राम सगळ्यांचे आहेत. सगळ्यांनी गेलं पाहिजे, ज्यांना ज्यांना बोलावलं आहे, त्यांनी सर्वांनी गेलं पाहिजे. तसेच, ज्यांना नाही बोलावलं त्यांनीही जायला हवं. कोणी जावं आणि कोणी जाऊ नये? हे ठरवणारं भाजप कोण? भाजपचा नारा होता की, 'मंदिर वही बनाएंगे...' जाऊन बघा मंदीर कुठे बनलं आहे. जिथे जागा होती तिथून तीन किमी अंतरावर मंदिर बनवलं आहे. डिस्प्युटेड प्रॉपर्टी अजूनही तशीच आहे.", असं संजय राऊत म्हणाले आहेत. 


पाहा व्हिडीओ : पाकिस्तानसोबतते भांडणाचे मुद्दे संपल्यामुळे केंद्र सरकार मालदीवसोबत भांडतंय : संजय राऊत