Nashik Politics News: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने नाशिकमध्ये ठाकरे गटाला अक्षरश: सुरुंग लावला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपने नाशिकमधील ठाकरे गटाचे (Shivsena UBT) अनेक महत्त्वाचे नेते आपल्याकडे वळवून घेतले आहेत. सुधाकर बडगुजर यांनी अलीकडेच भाजप आणि विलास शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर गुरुवारी भाजपकडून पुन्हा एकदा नाशिकमध्ये (Nashik News) राजकीय धमाका केला जाणार आहे. ठाकरे गटातील अनेक नेते आणि माजी नगरसेवक गुरुवारी मुंबईत भाजपचे (BJP) कमळ हातात घेणार आहेत. यामध्ये अवघ्या काही दिवसांपूर्वी महानगरप्रमुख पदाची जबाबदारी मिळालेल्या मामा राजवाडे यांचाही समावेश आहे. विलास शिंदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मामा राजवाडे (Mama Rajawade) यांच्या खांद्यावर महानगरप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र, आता तेच मामा राजवाडे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे नाशिकसह महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये भाजपने लावलेला पक्षप्रवेशाचा सपाटा पाहता महानगरपालिका निवडणुकीपर्यंत ते ठाकरे गटात पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिल्लक ठेवणार आहेत का, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
विशेष म्हणजे मामा राजवाडे यांच्यावर ठाकरे गटाने महानगरप्रमुख पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर पोलिसांची त्यांच्याकडे वक्रदृष्टी वळाली होती. ठाकरेंचे महानगरप्रमुख झाल्यावर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी एका मारहाण प्रकरणात मामा राजवाडे आणि सुनील बागूल यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. हे दोन्ही नेते त्याठिकाणी उपस्थितही नव्हते, असे सांगितले जाते. मात्र, पोलिसांनी त्यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला होता. त्यामुळे मामा राजवाडे आणि सुनील बागूल गेल्या काही दिवसांपासून फरार होते. मात्र, आता ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आता गुन्हे दाखल झालेले नेते भाजपला कसे चालतात, असा सवाल उपस्थित होण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मामा राजवाडे यांच्यासोबत ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका सीमा ताजणे, कमलेश बोडके, प्रशांत दिवे हेदेखील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तर शरद पवार गटाचे गणेश गीते हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या सगळ्यांच्या भाजपमधील पक्षप्रवेशाबाबत प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली होती. बुधवारी रात्री दीड वाजेपर्यंत याबाबत मुंबईत भाजपच्या गोटात गुप्त खलबतं सुरु होती. या बैठकीला गिरीश महाजन आणि नाशिकमधील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर मामा राजवाडे, सुनील बागूल आणि गणेश गिते यांना गुरुवारीच भाजपमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गुरुवारी दुपारी मुंबईतील भाजप मुख्यालयात या सगळ्यांचा पक्षप्रवेश पार पडेल. यामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे.
Sanjay Raut slams BJP: संजय राऊतांचं भाजपवर टीकास्त्र
मामा राजवाडे यांच्या पक्षांतराची माहिती समोर आल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन भाजपवर जोरदार टीका केली. भारतीय जमवा जमव पार्टीची कमाल आहे.नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले. हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले. पोलिस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले. क्लायमॅक्स असा की, हे सगळे फरार ( भाजपा साठी गुन्हेगार) आज भाजपात प्रवेश करत आहेत! जमवा जमव पार्टी ने महाराष्ट्राची वाट लावली आहे. सत्ता, पैसा, दहशत! दुसरे काही नाही!, असे संजय राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा