Maharashtra Politics : सध्या नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपपदावरून महायुतीतील (Mahayuti) वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी भाजपने (BJP) सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. भाजपच्या विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. यावरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केलेल्या व्यक्तव्याने भुवया उंचावल्या आहेत.
संजय शिरसाट म्हणाले की, काही नेते उगाच आपलं काही मत मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला काय सांगायचं ते आपल्या नेत्याला सांगा. आमची महायुती म्हणूनच निवडणूक लढण्याची इच्छा आहे. पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं काही म्हणणं असेल तर ते आम्हाला मान्य करावे लागेल.
...तर आम्ही स्वतः स्वबळावर लढायला तयार
आतापासूनच कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव जाणवत आहे. आपण एकत्र लढायचं की स्वबळावर लढायचं याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम ठेवू नये. महायुतीमध्ये लढायचं असेल तर हो म्हणा, एकत्र लढायचं नसेल असेल तर आम्ही स्वतः स्वबळावर लढायला तयार आहोत, असे संजय शिरसात यांनी म्हटले आहे.
हा घातपाताचा प्रकार
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं दिसून आलं. नाशिकमध्ये एका कार्यक्रमाला आलेल्या शिंदेंच्या आगमावेळी हवेत ड्रोन असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांची चांगलीच तारांबळ झाली. याबाबत संजय शिरसाट म्हणाले की, एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री असताना देखील त्यांना अनेक धमक्या आले आहेत. ठाण्यात काही लोक पकडले गेले होते. एकनाथ शिंदे यांच्या जीवाला जो धोका आहे तो अजूनही टळलेला नाही. त्यामुळे काल जो ड्रोन उडाला आहे. याबाबत सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे. निश्चित हा घातपाताचा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
धस-मुंडे भेटीवर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया
भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. यावरून विरोधकांनी सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. याबाबत विचारले असता संजय शिरसाट म्हणाले की, धनंजय मुंडे यांची प्रकृती खराब असल्याचे सुरेश धस यांचे म्हणणं आहे. पण ते तिथे कशाला गेले आणि त्या तिघांमध्ये काय चर्चा झाली याबाबत कोणाला माहित नाही. हे राजकीय भांडवल नाही, कुणाचातरी जीव गेला आहे. त्यांची जी कारवाई सुरू आहे त्याला अनुसरून सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. तुमची दिलजमाय झाली म्हणून मारणाऱ्याचा जीव गेला असं म्हणण्याचे काही कारण नाही. सुरेश धस यांनी देखील स्पष्ट केला आहे की, त्या प्रकरणाचा आणि भेटीचा काही संबंध नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून आरोपींना फाशीपर्यंत नेण्याचे काम सरकार करेल, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा