Devendra Fadnavis Eknath Shinde मुंबई: राज्यात सत्तास्थापनेपासूनच महायुतीत (Mahayuti) आलबेल नाही हे वारंवार घडणाऱ्या घडामोडींवरून दिसून येतंय. त्यातच आता महायुतीत मिठाचा खडा ठरेल अशी आणखी एक माहिती समोर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी भाजपने सुरू केल्याचं सागितलं जात आहे. त्यामुळे आगामी दिवसांत महायुतीमध्ये नेमकं काय घडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भाजपच्या विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या वादांच्या फेऱ्यानंतर स्वबळाचा नारा दिला जातोय का असा सवाल उपस्थित झालाय. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मात्र अजूनही महायुतीने एकत्र निवडणुका लढवण्यावर ठाम असल्याचं समजतंय. त्यामुळे महायुतीत महापालिका निवडणुकांबाबत संभ्रम आहे का असा सवाल उपस्थित होतोय. गेल्या काही दिवसातलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे यांच्या कथित कोल्डवॉरची किनार या स्वबळाच्या चाचपणीला आहे का असा सवालही या निमित्ताने निर्माण झालाय.
फडणवीस-शिंदेमधील अंतर वाढत चाललंय का?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शह-काटशहच राजकारण सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील अंतर वाढत चालल्याची चर्चा सुरु आहे . दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्याच्या आयोजनाची बैठक मुंबईत घेतली होती. सोबत इतर महानगरपालिका आढावा बैठका पार पडल्या. मात्र नगर विकास विभाग एकनाथ शिंदेंकडे असतानाही ते या बैठकांना गैरहजर राहिले. या बैठकींकडे पाठ फिरवत मलगंडच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं पसंद केलं. मंत्रालयातील मंत्रिमंडळ बैठक वगळता इतर मुख्यमंत्री यांनी आयोजीत केलेल्या अनेक बैठकांना एकनाथ शिंदे गैरहजर राहिले. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक विभागाच्या शंभर दिवसांचा आढावा बैठका घेतल्या. मात्र याही बैठकांना एकनाथ शिंदेंनी यांनी गैरहजेरी लावली. स्वतःच्या विभागाच्या बैठकीला ही ते उपस्थित राहिले नाही. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री असतील त्या मंचावर एकनाथ शिंदे यांनी बऱ्याचदा येण्याचं टाळलं. काही कार्यक्रमात ते एकत्र आले तर एकमेकांशी बोलण त्यांनी टाळलं, असं दिसून आलं.
खाजगीत शिवसेना मंत्र्यांची नाराजी-
सर्व विभागांमधील महत्त्वाच्या प्रोजेक्टचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची वॉर रुम आहे. मात्र आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नव्यानं कॉर्डीनेशन रुम तयार करुन आपल्या विभागांतील आणि शिवसेनेकडे असलेल्या खात्यांचा आढावा यातून घेणार आहेत. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरुन एकनाथ शिंदे आग्रही आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी घेतलेल्या निर्णयाला स्थगिती द्यावी लागली. यावर अद्याप निर्णय होताना पाहायला मिळत नाही. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर उपमुख्यमंत्रिपद घेण्यास एकनाथ शिंदे यांनी विलंब देखील लावला होता. तसेच मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी अनेक योजनांची घोषणा केली होती. त्यातील काही योजनांना ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याने खाजगीत शिवसेना मंत्र्यांची नाराजी आहे.