Shivsena leader Shivaji Mane : राज्यात शिवसेना (shivsena) आणि भाजप (BJP) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. आता या वादामध्ये शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी माने (Shivaji Mane) यांनी उडी घेत शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट टाकत स्वतःचे मत व्यक्त केले आहे. "राणे आता शिवसेनेला खुनी दिसू लागले आहेत, मुख्यमंत्री बनवलं होतं तेव्हा ते काय धुतल्या तांदळाचे होते का? असा सवाल त्यांनी शिवसेनेला केला आहे.
राणे आता शिवसेनेला खुनी दिसू लागले आहेत का?
"ईडी चे घोटाळे सर्व काढा परंतु राज्यसभेत आणि लोकसभेत लोकांचे प्रश्न मांडा, ईडी चे काय वाकडे होते ते सगळ्यांना माहीत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की कोणी किती कष्टाने कमाई केली आहे ते.. संजय राऊत कोण होते त्यांचा पगार किती होता किंवा राणे यांचा व्यवसाय कोणता होता...इतकेच नाही तर नारायण राणे आता खुनी दिसू लागले आहेत का? मुख्यमंत्री पदावर त्यांना बसवली तेव्हा ते धुतल्या तांदळाचे होते का?" असा सवाल त्यांच्याच पक्षाला म्हणजे शिवसेनेला केला आहे.
मुंबईत शिवसेना वाढली, तेव्हा राणेच होते..
"मुंबईत जी शिवसेना वाढली, ज्यात मोजून काही मंडळी होती त्यात राणे होते. उगाच शिळ्या कढीला ऊत काय आणता शेवटी तुम्ही आम्ही सर्वजण एका फाटक्या शिवसैनिकाच्या जीवावर मोठे झालो आहोत हे विसरून चाललो हे मात्र नक्की..." अशा आशयाची फेसबुक पोस्ट माजी खासदार शिवाजी माने यांनी करून शिवसेनेला जणू घरचाच आहेर दिला आहे.
राणेंच्या बंगल्यावर कारवाई होणार? पाहणीसाठी पालिकेचं पथक रवाना
दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या मुंबईतल्या जुहू इथल्या अधीश बंगल्या मुंबई महापालिकेच्या (BMC) पथकाकडून गेल्या तासभरापासून पाहणी सुरू आहे. तर नारायण राणे आज स्वतः अधीश बंगल्यात उपस्थित आहेत. अधीश बंगल्यात अनियमिततेचा संशय उपस्थित करत मुंबई महापालिकेनं याआधीच नोटीस पाठवली होती. त्यानुसार आज मुंबई महापालिकेचं पथक अधीश बंगल्यात (Narayan Rane Bungalow) धडकलं आहे. दरम्यान अधीश बंगला पूर्णपणे कायदेशीर असल्याचा दावा नारायण राणेंनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी काय पाहणी करणार, असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहे.
आज पालिका अधिकारी राणेंच्या अधिश बंगल्यात काय पाहणी करणार?
मुंबई महापालिकेकडे 2017 पासून राणे यांच्या अधिश बंगल्याबाबत तक्रार आहे. या तक्रारीत राणेंचा बंगला बांधताना सीआरझेडचे उल्लंघन झालं, तसेच बंगल्यात अनधिकृत बांधकाम करण्यात आलं असल्याचा उल्लेख आहे. यासंदर्भातच तपास करण्यासाठी मुंबई पालिका अधिकाऱ्यांचं पथक पहाणी करणार आहे. गेल्या आठवड्यात पालिकेनं नारायण राणे यांना नोटीस पाठवली होती. त्यामध्ये तुमच्या बंगल्याबाबत काही तक्रारी आहेत. यासंदर्भात तपासणी करायची आहे. तसेच, बंगल्याची आवश्यक ती कागदपत्र तुम्ही तयार ठेवा, असं नारायण राणेंना कळवलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे आज राणेंच्या बालेकिल्ल्यात; तर महापालिकेचे पथक राणेंच्या जुहूमधील बंगल्यावर
- राणेंच्या बंगल्याच्या बांधकामात अनियमितता, केंद्राकडूनही सीआरझेडची नोटीस : महापौर किशोरी पेडणेकर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha