Rajendra Gavit : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वातील महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार नागपूरमध्ये रविवारी पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक बड्या नेत्यांचा पत्ता कट झालाय. शिवसेनेतून (Shiv Sena) तानाजी सावंत (Tanaji Sawant), दीपक केसरकर (Deepak Kesarkar), अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. तर मंत्रिपद न मिळाल्याने भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकरांनी काल शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिला. तर अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत, असे म्हणत विजय शिवतारे यांनी संताप व्यक्त केला. आता शिवसेना आमदार राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.   


राजेंद्र गावित म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये आदिवासी आमदारांना स्थान दिले आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्याकडे सहा आमदार असून देखील त्यांनी आदिवासी समाजातला एकही आमदार दिलेला नाही. गेल्या सरकारने देखील आदिवासी समाजाला गृहीत धरले होते. त्यामुळे आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. या समस्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर नक्कीच एक आदिवासी आमदार हा मंत्री असायला हवा होता, आणि असे वाटत आहे की जी एक जागा रिक्त आहे त्या ठिकाणी एकनाथ शिंदे हे आदिवासी आमदार मंत्री म्हणून देतील, असे त्यांनी म्हटले आहे. 


नरेंद्र भोंडेकरांचा राजीनामा 


राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेने काही जुन्या, तर काही नवीन नेत्यांना संधी दिली आहे. नवीन चेहऱ्यात संधी मिळण्याची भोंडेकर यांना आशा होती. मात्र, त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. यानंतर नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेते पदाचा आणि पूर्व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिलेला आहे.  


विजय शिवतारेंचा हल्लाबोल


शिवसेनेचे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे यांनीही मंत्रिपदावरुन नाराजी व्यक्त केली. "पद मिळाले नाही, याचं काही वाटत नाही. पण त्यापेक्षा आम्हाला मिळालेल्या वागणुकीचं वाईट वाटतं. तिन्ही नेते साधे भेटायला तयार नाहीत. मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराजी 100 टक्के आहे. आता अडीच वर्षांनी मंत्रीपद दिलं तरी मी घेणार नाही. मला मंत्रि‍पदाची गरज नाही. मला माझ्या मतदारसंघातील कामं मुख्यमंत्र्यांकडून करुन घेणे अधिक महत्त्वाचे वाटते. मंत्रि‍पदाबाबत मला राग नाही. पण दिलेल्या वागणुकीबद्दल प्रचंड राग आहे", असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.  


शिवसेनेकडून नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न


दरम्यान, नाराज आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या गटातून सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मीडियाच्या माध्यमातून नाराजीला वाचा फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर मात्र एकनाथ शिंदे हे नाराज झाल्याचे देखील समजते. त्यामुळे नाराजी व्यक्त केलेल्या आमदारांना नाराजीचा फटका बसण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे श्रध्दा आणि सबुरी ठेवणाऱ्यांनाच भविष्यात शिवसेनेकडून मंत्रीपदं मिळतील, अशी राजकीय वर्तुळात रंगली आहे.


शिवसेनेकडून कुणाला मंत्रि‍पदं? 



  1. उदय सांमत- कॅबिनेट मंत्री 

  2. प्रताप सरनाईक- कॅबिनेट मंत्री 

  3. शंभूराज देसाई- कॅबिनेट मंत्री 

  4. भरत गोगावले- कॅबिनेट मंत्री 

  5. दादा भुसे - कॅबिनेट मंत्री 

  6. प्रकाश आबिटकर- कॅबिनेट मंत्री

  7. गुलाबराव पाटील- कॅबिनेट मंत्री  

  8. संजय राठोड- कॅबिनेट मंत्री 

  9. संजय शिरसाट - कॅबिनेट मंत्री 

  10. योगश कदम- राज्यमंत्री 

  11. आशिष जयस्वाल- राज्यमंत्री


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Chhagan Bhujbal: अजित पवारांशी बोलायची गरज नाही; छगन भुजबळ संतप्त, अधिवेशन सोडून नाशिककडे रवाना


Vijay Shivtare on Cabinet Expansion: अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; विजय शिवतारे संतापले