Kishor Patil: पाचोरा येथे झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde Faction) निर्धार मेळाव्यात आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्ला चढवला. भाजपच्या बंडखोरांना पुन्हा पक्षात घेतल्याबद्दल त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. “महायुतीच्या एक वर्षाच्या काळात आमदारांना एक फुटकी कवडीही मिळाली नाही,” असा टोला लगावत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला. “शिवसेनेच्या पाचही आमदारांनी ठरवलं, तर जळगाव जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा अध्यक्ष बसणार. भाजपचे नेते युतीबद्दल बोलतात पण हे कधी पलटी खातील, याचा भरोसा नाही,” असे देखील किशोर पाटील यांनी म्हटले.
किशोर पाटील म्हणाले की, भाजपमध्ये बंडखोरी केली तर पाच वर्ष हकालपट्टी होईल, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूर सभेत म्हटले. मात्र विधानसभेच्या वेळी माझ्या मतदारसंघात बंडखोरी करण्यात आली. त्यावेळेस मी त्यांना फोन करायचो मात्र ते फोन उचलत नव्हते, ज्यांनी बंडखोरी केली त्यांच्यावर कारवाई न करता पदाच्या रूपाने त्यांना तुम्ही शाबासकी देत आहात, असे म्हणत त्यांनी बंडखोरांना पक्षात घेण्यावरून भाजपवर टीका केली.
Kishor Patil on Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचे कौतुक
आज काय चालले ते माहित नाही. मात्र एकनाथ शिंदे यांच्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री काळात त्यांनी एक दिवसाच्या नायक चित्रपटातील मुख्यमंत्र्यासारखं काम केलं. आजपर्यंतच्या इतिहासातला पहिला मुख्यमंत्री मी पाहिला ते म्हणजे एकनाथ शिंदे यांना. प्रत्येक भगिनीला जर तुम्ही विचारलं तर तुझा लाडका भाऊ कोण तर सख्ख्या भावाच्या आधी लाडकी भगिनी सांगते की माझा लाडका भाऊ एकनाथ शिंदे आहे, असे म्हणत किशोर पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे यांचे कौतुक केले.
Kishor Patil on Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले नाही हे दुर्दैव
किशोर पाटील पुढे म्हणाले की, लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांचे मानधन एकनाथ शिंदे यांनी सुरू केले. दीड हजार रुपयांची किंमत ग्रामीण भागातील लाडक्या बहिणींना माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं मी जर का पुन्हा मुख्यमंत्री झालो तर 1500 रुपयांचे मानधन 2100 रुपये करणार आहे. पण एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री झाले नाही हे दुर्दैव आहे. मला त्या विषयावर जास्त बोलता येणार नाही. कारण गुलाबराव पाटील मंत्रिमंडळात आहेत, असे त्यांनी म्हटले.
Kishor Patil on Mahayuti: जाहीर सभेत महायुतीचे काढले वाभाडे
महायुतीच्या एक वर्षाच्या काळात एक फुटकी कवडी सुद्धा आमदारांना मिळाली नाही. वर्षभरात एक कवडीही न मिळाल्याने आम्हाला फक्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सहारा आहे. अतिवृष्टीमुळे माझ्या मतदारसंघातील विकासाची भर वर्षभरात काढू शकत नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन पाच टक्के निधीमधून किमान 50 टक्के निधी हा आपल्या मतदारसंघाला द्यावा, असे म्हणत त्यांनी जाहीर सभेत महायुतीचे वाभाडे काढले.
Kishor Patil on Maharashtra Government: राज्य सरकारला घरचा आहेर
अतिवृष्टीमुळे इतका सत्यानाश झाला. मात्र, आता शासनाकडून काय अपेक्षा करावी. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक रुपयात पिक विमा ही योजना राबवली होती. जर एक रुपयाचा पिक विमा यावर्षी चालू राहिला असता तर शासनाकडे हात पसरवण्याची गरज शेतकरी बांधवांना आली नसती. तुम्ही एक रुपयाचा पिक विमा ही बंद केला आणि आज शेतकरी हवालदिल झाला, असे म्हणत किशोर पाटलांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला.
Kishor Patil on Farmer Loan Waiver शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करा
बच्चू कडू कोणत्या पक्षाचे आहेत. मला माहिती नाही. मात्र बच्चू कडू यांनी राज्यातील तमाम शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावं याच्यासाठी आंदोलन केलं. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, असे म्हणत किशोर पाटील यांनी शेतकरी आंदोलनावरून बच्चू कडूंचे जाहीर आभार मानले. मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो की, आता 30 जूनची तारीख देऊ नका. शेतकरी हा आज त्रस्त झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करा, अशी मागणी देखील त्यांनी केली.
Kishor Patil on Sharad Pawar Ajit Pawar: किशोर पाटलांचा पवारांना टोला
किशोर पाटील पुढे म्हणाले की, शरद पवार असो व अजित पवार असो हे कधी कोणावर गुगली टाकतील हे महाराष्ट्राला अजून पण कळलेलं नाही. मात्र राष्ट्रवादीत असलेले माजी आमदार दिलीप वाघ या दोघा पवारांना उल्लू बनवून ते भाजपात गेले. दिलीप वाघ हे कोणत्या पवारांकडे होते हे आजपर्यंत आम्हाला समजलं नाही, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.
Kishor Patil: शिक्षण मंत्री हे शिवसेनेचे हे विसरू नका
पाचोरा-भडगाव मतदार संघात आपल्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या सर्व विरोधकांना भाजपने पक्षात घेतले आहे. मात्र जे पक्षात घेतले हे सर्व संस्था चालक असून शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्रातील सर्व शिक्षण संस्थांवर एसआयटी लावली. त्यामुळे एसआयटीच्या भीतीने हे सर्व भाजपमध्ये गेल्याचा आरोप किशोर पाटील यांनी केला आहे. या संस्थाचालकांनी मोठा भ्रष्टाचार आपल्या संस्थेमध्ये केला असून आपली चामडी वाचवण्यासाठी हे सर्व भाजपमध्ये गेले आहेत. मात्र भाजपमध्ये जाऊन गोरगरीब जनतेचे तसेच विद्यार्थ्यांचे आर्थिक फसवणूक करणार असाल तर आज पासून सावध रहा. मुख्यमंत्री जरी भाजपचे असले तरी शिक्षण मंत्री हे शिवसेनेचे आहे हे विसरू नका, असे म्हणत किशोर पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पाचोरा भडगाव मतदार संघातील विरोधकांना इशारा दिला आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा व्हिडीओ
आणखी वाचा