मुंबई : कधी होणार, कधी होणार म्हणता म्हणता शिंदेंच्या सेनेनं (Eknath Shinde Shiv Sena) लेट पण थेट अशा तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. आता या तिन्ही उमेदवारांच्या प्रचाराचा आवाज घुमणार आहे. मात्र या आवाजात पत्ता कट झालेल्यांच्या नाराजीचा सूर तर उमटणार नाही ना अशी कुजबुज आता रंगल्याचं दिसतंय. कारण यातील प्रत्येक ठिकाणी एक जागा आणि अनेक इच्छुक दादा अशी परिस्थिती होती. 


नाशिकचा उमेदवार ठरला, पण इतरांची भूमिका काय? 


त्यातल्या नाशिकच्या जागेवर तर रोजच्या रोज ट्विस्ट मागून ट्विस्टची रांगच लागली होती. नाशिकमध्ये शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नाशिकच्या उमेदवाराची घोषणा झालेली नसताना अर्ज भरताना थेट शिंदेंच्या शिवसेनेचा उल्लेख केला आणि गोंधळात गोंधळ निर्माण झाला. आता हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर झाल्यावरही शांतीगिरी महाराज लढण्यावर ठाम आहेत. 


शांतीगिरी महाराजांच्या भूमिकेची नाशिकसह महाराष्ट्रभर चर्चा रंगलेली असतानाच नाशिकच्या उमेदवारीबाबत दुसरा ट्विस्ट निर्माण झाला तो छगन भुजबळ यांच्यामुळे. उमेदवारी जाहीर होत नसल्याने आपण निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचं भुजबळांनी सांगितलं आणि ते नाराज असल्याची चर्चा रंगली. तर हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर झाल्यावर भुजबळांनी गोडसेंचा प्रचार ताकदीने करणार असल्याची ग्वाही दिली.


नाशिकमधून महायुतीकडून निवडणूक लढवण्यास कोण कोण होते इच्छुक ?


- छगन भुजबळ, राष्ट्रवादी
- दिनकर पाटील, भाजप 
- विजय करंजकर, ठाकरे गट 
- अनिकेत शास्त्री देशपांडे, महंत 
- शांतिगिरी महाराज, महंत 


हे तर झालं नाशिकचं मात्र, उमेदवारी जाहीर झालेल्या इतरही अनेक ठिकाणी जागा एक आणि इच्छुक अनेक अशी चर्चा रंगली होती.


ठाण्यातील इतर इच्छुक शिंदेंच्या मस्केंना मदत करणार का? 


शिवसेना शिंदे गटाच्या तीन जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यापैकी सगळ्यात महत्त्वाची जागा ठाणे लोकसभा मतदारसंघ असून सोबतच कल्याण आणि नाशिकचा उमेदवार देखील जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचा गड मानला जाणारा ठाणे भाजप स्वतःकडे घेण्यास उत्सुक होते, त्यासाठी भाजपकडून संजीव नाईक आणि आमदार संजय केळकर यांची नावे चर्चेत होती. तर एकनाथ शिंदे यांच्याकडून नरेश मस्के प्रताप सरनाईक, मीनाक्षी शिंदे आणि रवींद्र फाटक यांचे नाव चर्चेत होते.


एकनाथ शिंदे यांच्या हार्ड बार्गेनिंगमुळे ठाण्याची जागा सेनेला मिळाली तर अनपेक्षितपणे नरेश मस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे इतर चार नावांचा पत्ता कट झाला आहे. आता सेनेतील तीन इच्छुक आणि भाजपमधील दोन इच्छुक नेते नरेश मस्के यांना कशाप्रकारे मदत करतात हे बघणे पाहावं लागेल. 


लोकसभा उमेदवारीमध्ये  कोणाला तिकीट आणि कोणाची होती चर्चा?


उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये रवींद्र वायकर यांना तिकीट जाहीर करण्यात आलं. त्या ठिकाणी सिद्धेश कदम, संजय निरुपम, गोविंदा, गजानन कीर्तिकर यांच्या नावाची चर्चा होती. 


दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघांमध्ये  यामिनी जाधव यांना तिकीट देण्यात आलं. पण त्या ठिकाणी भाजपचे राहुल नार्वेकर, मंगल प्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा होती. 


ठाणे लोकसभा मतदारसंघात नरेश म्हस्के यांना तिकीट देण्यात आलं. पण ठाण्यामधून प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, मीनाक्षी शिंदे, संजीव नाईक यांच्या नावाची चर्चा सुरू होती.  


एकूणच एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपण नाराज असल्याचं सहसा कुणी सांगत नसलं तरी आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पत्ता कट झालेले इच्छुक नेते प्रचारात पूर्ण ताकदीने उतरतात का हे बघणं महत्त्वाचं आहे.


ही बातमी वाचा: