मुंबई : महायुतीमधील जागावाटपाचा तिढा आज अखेर संपुष्टात आल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्वातील शिवसेनेनं ठाणे, कल्याण आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यामुळे, जागावाटपात शिंदेंना कमी जागा मिळतील, असा दावा फोल ठरला आहे. शिंदेंनी शेवटपर्यंत शिवसेनेच्या (Shivsena) जागांवरील दावा कायम ठेवल्यामुळे जागावाटपात 15 जागा शिवसेनेच्या वाटेला आल्या आहेत. अद्यापही पालघरची जागा नेमकं कोणाला सुटणार, याबाबत स्पष्टता झालेली नाही. त्यातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज शिवसेना उमेदवारांसोबत बैठक घेऊन महायुतीच्या उमेदवारांबाबत चर्चा केली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना, मुंबईतील सहाही जागा महायुती (Mahayuti) जिकणार असून मुंबईत विजयाचा षटकार ठोकणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री शिंदेंनी बोलून दाखवला. 


महायुतीमधील जागावाटपात काही विद्यमान खासदारांच्या जागा आपल्या पदारात पाडून घेण्यात एकनाथ शिंदेंना यश आले आहे. मात्र, भावना गवळी, हेमंत पाटील यांच्यासारख्या काही विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. तसेच, महायुतीमध्ये काही जागांवर उमेदवार व स्थानिक पदाधिकारी यांच्यात मतभेद असल्यानेही त्यांची नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान पक्षश्रेष्ठींकडे आहे. त्यामुळे, अंतिम जागावाटपानंतर शिवसेनेतील जे-जे नाराज आहेत, त्यांची समजूत काढली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटले. आपले मतभेद बाजून ठेऊन प्रत्येकाने महायुतीचा धर्म पळाला पाहिजे, पुढील भविष्यासाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे.  त्यामुळे, सर्वांनाच कामाला लागण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदेंनी केल्या आहेत.


विकास हाच अजेंडा


समोरचे टीका करत राहणार, पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही विकासाचा मुद्दे सगळ्यांसमोर मांडा. लोकसभा निवडणुकीत "विकास" हाच आपला अजेंडा असला पाहिजे. महाराष्ट्रातील इतर भागातील निवडणुका आता पूर्ण झाल्या आहेत, त्यामुळे तिथल्या आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची व्यवस्था मुंबईमध्ये करा, त्यांची मुंबईसाठी मदत घ्या, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत केल्या आहेत. 


मुंबईत षटकार, राज्यात 15 जागा जिंकणार


राहुल शेवाळे, रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव आज भेटीसाठी आले होते, त्यांच्यासोबत निवडणुकीची पुढील रणनीती ठरवण्यात आली. मुंबईतील एकूण सहाही जागा महायुती जिंकेल असं वातावरण आहे. शिवसेनेचे राज्यातील सर्व 15 उमेदवार निवडून येतील. तर, मुंबईमध्ये विजयाचा षटकार मारणार असल्याचंही मुख्यमंत्री शिंदेंनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. 


मुंबईत भाजपा 3 व शिवसेना 3 उमेदवार


दरम्यान, मुंबईत महायुतीच्या जागावाटपात भाजपाला 3 तर शिवसेनेला 3 जागा मिळाल्या आहेत. त्यामध्ये, शिवसेनेकडून दक्षिण मुंबईत यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबई उत्तर-पश्चिममधून रविंद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दक्षिण मध्ये लोकसभा मतदारसंघातून राहुल शेवाळे शिवसेनेचे उमेदवार आहेत.