भोसरी, पुणे : अजित पवारांनी शिरूर लोकसभेसाठी (Shirur Loksabha Constituency) शिवाजी आढळरावांची (Adhalrao Patil) वर्णी लावली, तेंव्हापासून भोसरीचे माजी आमदार विलास लांडे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या. आढळराव पाटलांच्या प्रवेशाच्या कार्यक्रमालादेखील विलास लांडे अनुपस्थित होते. त्यानंतर ते कोणती भूमिका घेतील? किंवा ते शरद पवारांच्या गटात सामील होतील का?, असे प्रश्न उपस्थित झाले असतानाच शिरुरचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हेंनी विलास लांडेंसंदर्भात सुचक वक्तव्य केलं आहे. कोल्हेंच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विलास लांडे हे शरद पवार गटात येण्यासाठी संपर्क साधतायेत का? असं विचारलं असता मोहीम फत्ते झाल्याशिवाय निकाल सांगायचा नसतो, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत. त्यामुळे विलास लांडे येत्या काही दिवसांत कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


शिरुर लोकसभा काबीज करण्यासाठी आणि अजित पवार गटाचा उमेदवार असलेल्या आढळराव पाटलांचा पराभव करण्यासाठी अमोल कोल्हे शिरुर लोकसभा मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहे. गुड फ्रायडे, शनिवार आणि रविवार अशा सलगच्या सुट्ट्या आल्या आहेत. याच सुट्ट्यांची संधी लोकसभेतील उमेदवार घेतायेत. शिरूर लोकसभेतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे ही सुट्ट्यांचा फायदा घेण्यासाठी घाम गाळताना दिसत आहे. भोसरी विधानसभेतील मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी कोल्हे या सुट्ट्यांचा फायदा घेताना दिसत आहे. आज ते भोसरी विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या भेटीगाठी घेताना दिसत आहे.