पुणे: पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघापैकी एक असलेल्या शिरुरमध्ये यंदा काय निकाल लागणार, याकडे सध्या अवघ्या राजकीय वर्तुळाचे लागले आहे. शिरुरमध्ये (Shirur Loksabha) यंदा महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन हेविवेट राजकारणी रिंगणात आहेत. शिरुरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्याविरोधात शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी पुन्हा एकदा दंड थोपटले आहेत. महायुतीच्या जागावाटपात शिरुरची जागा अजित पवारांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडे आली. त्यामुळे शिंदे गटात असणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश करावा लागला. आता ते घड्याळ्याच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तर वंचित बहुजन आघाडीने या मतदारसंघातून आफताब शेख यांना रिंगणात उतरवले आहे. मात्र, शिरुर लोकसभा मतदारसंघाची मुख्य लढाई ही तुतारी विरुद्ध घड्याळ म्हणजे अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातच रंगेल, असा अंदाज आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघाची पार्श्वभूमी?
शिरुर लोकसभा मतदारसंघ हा पश्चिम महाराष्ट्रातील प्रतिष्ठित मतदारसंघांपैकी एक आहे. बारामती आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या खालोखाल शिरुर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. ऐतिहासिकदृष्ट्या या मतदारसंघाला विशेष महत्त्व आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ ‘शिवनेरी’, छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ ‘वढू-तुळापूर’, ज्ञानेश्वर महाराजांनी जीवंत समाधी घेतलेले ‘आळंदी’, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर, हुतात्मा राजगुरुंचे जन्मस्थळ राजगुरुनगर (पूर्वीचे खेड) यांसारख्या स्थळांचा समावेश आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघ हा सुरुवातीच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या मतदारसंघावर भगवा फडकावला. ते तीन टर्म या मतदारसंघाचे खासदार होते. एक काळ असा होता की, या मतदारसंघावर आढळराव पाटील यांचे एकहाती वर्चस्व होते. या लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचे प्राबल्य असतानाही शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सलग तीनवेळा या मतदारसंघात विजय मिळवण्याची किमया साधली होती.
या लोकसभा मतदारसंघात जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, भोसरी, आणि हडपसर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी जुन्नरमध्ये अतुल बेनके, आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील, खेडमध्ये दिलीप मोहिते पाटील, शिरुरमध्ये अशोक पवार, भोसरीत भाजपचे महेश लांडगे तर हडपसरमध्ये चेतन तुपे हे आमदार आहेत.
अमोल कोल्हेंचा आढळरावांच्या साम्राज्याला धक्का, पुन्हा तीच किमया साधणार?
शिरुरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करणे ही 2019 पर्यंत अशक्यप्राय बाब मानली जात होती. परंतु, 2019 मध्ये शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांना शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणले. अमोल कोल्हे हे टेलिव्हिजनवरील ‘राजा शिवछत्रपती’ आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकांमुळे प्रचंड लोकप्रिय होते. शरद पवारांनी त्यांना शिरुरमधून रिंगणात उतरवले तरी ते आढळराव पाटील यांच्यासमोर टिकाव धरु शकतील, का याबाबत शंका होती.
मात्र, या निवडणुकीत शिवाजीराव आढराव पाटील यांच एक चूक त्यांना भोवल्याचे सांगितले जाते. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्या जातीचा उल्लेख केला. यावरुन बराच गदारोळ झाला होता. प्रचारात याचा पुरेपूर फायदा उठवत शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराचा पराभव करत अमोल कोल्हे जायंट किलर ठरले होते.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काय होणार?
अमोल कोल्हे हे 2019 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून गेले होते. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या तुलनेत अमोल कोल्हे खासदार म्हणून अजूनही नवखे आहेत. मात्र, गेल्या पाच वर्षांमध्ये अमोल कोल्हे यांनी संसदेत प्रभावी कामगिरी केली आहे. लोकसभेतील उपस्थितीपासून ते प्रश्न विचारण्यापर्यंत अमोल कोल्हे यांनी एक खासदार म्हणून आपल्यातील चमक दाखवून दिली आहे. अमोल कोल्हे यांना तीनवेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे अवघ्या पाच वर्षांच्या काळात अमोल कोल्हे हे एक अभ्यासू आणि संयमीपणे राजकारण करणारे नेते म्हणून उदयाला आले आहेत. अमोल कोल्हे यांच्याकडे असलेल्या अंगभूत वकृत्त्व कौशल्यामुळे ते आपला मुद्दा प्रभावीपणे मतदार आणि जनतेपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे निवडणुकीच्या काळात होणाऱ्या शाब्दिक द्वंद्वामध्ये अमोल कोल्हे हे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यापेक्षा काहीसे वरचढ ठरताना दिसतात.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अमोल कोल्हे यांनी शरद पवारांशी निष्ठा कायम राखली होती. अजित पवार यांनी स्वत: त्यांना आपल्या गटात येण्याची ऑफर दिल्याची चर्चा होती. मात्र, अमोल कोल्हे यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गेल्या काही काळात अमोल कोल्हे यांची ओळख शरद पवारांच्या जवळचा नेता म्हणून अशी झाली आहे. अमोल कोल्हे यांनी चाणाक्षपणे या सगळ्या गोष्टींचा भावनिक राजकारणासाठी पुरेपूर वापर केला आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील समोर असूनही शिरुरची लढाई तुल्यबळ मानली जात आहे.
या सगळ्या गोष्टी असल्या तरी शिरुरच्या राजकारणात शिवाजीराव आढळराव पाटील यांचे स्वत:चे असे एक वेगळे स्थान आहे. या मतदारसंघात त्यांनी केलेल्या विकासकामांची मतदारांना जाण आहे. अमोल कोल्हे हे संसदेत आणि मीडियाशी बोलताना उजवे ठरत असले तरी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे अनेक वर्षांचा अनुभव आणि दांडग्या जनसंपर्काची शिदोरी आहे. त्यांनी शिरुरच्या मतदारांची नस माहिती आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील शिरुर मतदारसंघ अमोल कोल्हेंच्या ताब्यातून पुन्हा खेचून आणणार का, हे पाहावे लागेल.
शिरुर मतदारसंघात कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरणार?
शिरुर लोकसभा मतदारसंघात खेड, चाकण, भोसरी, रांजणगाव यांसारख्या औद्योगिक क्षेत्राचा समावेश होतो. गेल्या काही वर्षांमध्ये या मतदारसंघात विकासामुळे शेतीचे क्षेत्र झपाट्याने कमी होत चालले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. याशिवाय, या मतदारसंघात बैलगाडा हा मुद्दा जिव्हाळ्याचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली होती. यावरुन श्रेयवादाचे राजकारण रंगले होते. परंतु, निवडणुकीत बैलगाडा चालक आणि बैलगाडाप्रेमी कोणाच्या पारड्यात मत टाकणार, हे पाहावे लागेल. याशिवाय, मराठा आरक्षण आंदोलन, ओबीसी मोर्चा आणि वंचित फॅक्टरही या निवडणुकीवर प्रभाव टाकू शकतो.
आणखी वाचा
मी लढणार, निवडणुकीला उभं राहणार आणि निवडूनही येणार, शिरुर मतदारसंघात आढळराव पाटलांचे आव्हान