Shirdi Loksabha: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला शिर्डी मतदारसंघात मोठा झटका बसला आहे. काँग्रेसच्या नेत्या उत्कर्षा रुपवते यांनी बुधवारी संध्याकाळी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupwate) या शिर्डीची जागा ठाकरे गटाला सोडण्यात आल्यामुळे नाराज होत्या. हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, अशी त्यांची आग्रही मागणी होती. मात्र, जागावाटपात शिर्डी (Shirdi Loksabha) ठाकरे गटाच्या वाट्याला आल्याने उत्कर्षा रुपवते नाराज झाल्या होत्या. त्यांना या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती. त्यामुळे आता काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन उत्कर्षा रुपवते या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत (VBA) प्रवेश करण्याची शक्यता आहे. उत्कर्षा रुपवते या अकोल्यात दाखल झाल्या असून आज रात्रीच त्यांचा पक्षप्रवेश पार पडण्याची शक्यता आहे. 


शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे आणि ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरे  यांच्यात लढत रंगणार होती. मात्र, आता वंचितने उत्कर्षा रुपवते यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यास शिर्डीची लढत तिरंगी होईल. याचा फटका ठाकरे गटाच्या उमेदवाराला बसणार आहे. अगोदरच शिर्डीत काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी मविआचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. त्यानंतर आता आणखी एका मतदारसंघात काँग्रेसचा बंडखोर ठाकरेंच्या उमेदवाराल अपशकुन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता यावर काँग्रेस पक्ष आणि ठाकरे गट काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.


शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा राखीव आहे. हा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु, 2009 नंतर शिर्डीची जागा सातत्याने शिवसेनेकडे राहिली होती. 2014 मध्ये भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, या निवडणुकीत सदाशिव लोखंडे यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांचा पराभव केला होता. परंतु आता वाकचौरे हे पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेकडून रिंगणात उतरले आहेत. अशात उत्कर्षा रुपवते यांच्यामुळे मविआच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. याचा भाऊसाहेब वाकचौरे यांना कितपत फटका बसणार, हे पाहावे लागेल.


आणखी वाचा


शिर्डी लोकसभेत शिवसैनिकच आमने-सामने, काँग्रेस नेत्या बंडखोरीच्या तयारीत, कोण मारणार बाजी?