पुणे: वसंत मोरे यांना पंतप्रधान व्हायचं आहे. ते सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत, अशी खोचक टिप्पणी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी केली. ते बुधवारी पुण्यात (Pune News) बोलत होते. यावेळी अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी अनौपचारिक गप्पांच्या कार्यक्रमात अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले.


पुण्यातील मनसेचे फायरब्रँड असलेले नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी अलीकडेच पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. आता वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून पुणे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. याविषयी अमित ठाकरे यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, वसंत मोरे यांना पंतप्रधान व्हायचं आहे. ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत. त्यांनी मनसेकडून पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा राज साहेबांचा आदेश पाळावा आणि महायुतीच्या प्रचारात सहभागी व्हावे, असे अमित ठाकरे यांनी म्हटले. यावर आता वसंत मोरे काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.


राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांचा विचार करुन महायुतीला पाठिंबा दिला असेल: अमित ठाकरे


यावेळी अमित ठाकरे यांनी मनसेने लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला दिलेल्या पाठिंब्याविषयी भाष्य केले. अमित ठाकरे यांनी म्हटले की, देशात पुन्हा मोदी सरकार येणार आहे. मोदी सरकारला 300 च्या आसपास जागा मिळतील. राजसाहेबांनी कार्यकर्त्यांचा विचार करुनच बिनशर्त पाठिंब्याचा निर्णय घेतला असणार. लोकसभा निवडणुकीत मनसेचे जे पदाधिकारी महायुतीविरोधात प्रचार करतील त्यांच्यावर कारवाई होणार, असे अमित ठाकरे यांनी म्हटले.


यावेळी अमित ठाकरे यांनी मुंबईतील लोकसभेच्या जागांबाबतही भाकीत केले. उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला मुंबईत एकही जागा मिळणार नाही. त्यांच्याविरोधात वातावरण आहे, असे अमित ठाकरे यांनी म्हटले. राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर भाजप लोकसभेला मनसेसाठी एक जागा सोडेल, अशी चर्चा होती. अशा परिस्थितीत दक्षिण मुंबईतून अमित ठाकरे लोकसभा निवडणूक लढवतील, असे सांगितले जात होते. मात्र, राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर ही शक्यता मावळली होती. 


राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदींची मुंबईत एकत्र सभा


यावेळी अमित ठाकरे यांनी एक महत्त्वाची माहिती दिली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची मुंबईत एकत्र सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे राज ठाकरे हे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या बाजूने प्रत्यक्ष प्रचारात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


आणखी वाचा


'वसंत मोरे यांनी योग्य निर्णय घेतला', राज ठाकरेंच्या भूमिकेवर नेटकरी काय काय म्हणाले?