अहमदनगर (शिर्डी) : शिर्डी लोकसभा मतदारसंघात (Shirdi Lok Sabha Seat) तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झालं आहे. काँग्रेस (Congress) पक्षाचा राजीनामा देत उत्कर्षा रूपवते (Utkarsha Rupwate) यांनी वंचित बहुजन आघाडीत (Vanchit Bahujan Aghadi) प्रवेश केला. अनेक महिने मागणी करूनही पक्षाने दखल न घेतल्याने अखेर उत्कर्षा रूपवते यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्यानंतर त्यांना शिर्डीची उमेदवारी देखील आता जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी सामना रंगणार असून ही तिरंगी लढत रंगतदार होईल यात शंका नाही. वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्यानंतर उत्कर्षा रूपवते यांनी एबीपी माझा सोबत बोलताना वंचितमध्ये प्रवेश करुन निवडणूक लढण्याचा निर्णय का घेतला याचं कारण सांगितलं. निवडणुकीला सामोरं जाताना सत्यजीत तांबे यांचा सल्ला देखील घेणार असल्याचं उत्कर्षा रुपवते म्हणाल्या.   


उत्कर्षा रूपवते काय म्हणाल्या? 


आम्ही तीन पिढ्यांपासून काँगेस सोबत आहोत. पक्ष संघटनेसाठी जे देता येईल ते देत आलेय.जेव्हा निवडणुकीच्या राजकारणाची वेळ आली त्यावेळी संधी असताना ती मिळू शकली नाही याची खंत वाटते, असं उत्कर्षा रुपवते म्हणाल्या. 


सांगली आणि शिर्डीची परिस्थिती वेगळी आहे. शिर्डीच्या जागेसाठी मोठ्या ताकदीनं शिवसेनेकडून मागणी केली जात होती. शिर्डीच्या जागेसाठी बाळासाहेब थोरात यांनी खूप प्रयत्न केले. तिन्ही पक्षांचे उमेदवार स्वतंत्रपणे जाहीर करत होते. मात्र आघाडी असताना समन्वय नव्हता हे सिद्ध झालं.  घटक पक्ष विचारात न घेता निर्णय जाहीर करत होते. काँग्रेस मधील अंतर्गत राजकारण नवीन नाही. मविआमध्ये ही जागा काँग्रेससाठी मागा, असं सांगितलं होतं.शिर्डीसाठी दिलेला उमेदवार बदला ही मागणी सुद्धा मान्य झाली नाही. अनुसूचित जाती साठी राखीव असताना आम्हाला संधी नसल्याने हा निर्णय घ्यावा लागला.. या लोकसभा निवडणुकीत जनतेची उमेदवार म्हणून पुढं जाणार असल्याचं उत्कर्षा रुपवते म्हणाल्या.


सत्यजीत तांबे यांचा सल्ला घेणार


शिर्डी लोकसभेचे अनेक प्रश्न आहेत. पाणी, रस्ते, आरोग्य हे मुख्य प्रश्न आहेत. शिर्डीसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचं शहर आहे. छोट्या छोट्या समाजघटकांना संधी देण्याचं व्हिजन प्रकाश आंबेडकर यांचं आहे, असं उत्कर्षा रुपवते म्हणाल्या.  


सत्याजीत तांबे आणि आमचे घरगुती संबंध आहेत. निवडणुकीत कसं पुढं जायचं यासाठी त्यांचा सल्ला घेणार आहे.मतदारसंघात असणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे आशीर्वाद देखील घेणार आहे, असं उत्कर्षा रुपवते म्हणाल्या. युवकांना बरोबर घेऊन त्यांना संधी दिली गेली पाहिजे. मात्र योग्यवेळी पक्ष निर्णय घेऊ शकला नाही तर निर्णय घ्यावे लागतात, असं उत्कर्षा रुपवते यांनी सांगितलं. 


संबंधित बातम्या : 


Lok Sabha Election : शिर्डीत तिरंगी लढतीचं वारं, काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवते तातडीनं वंचितमध्ये, शिंदे अन् ठाकरेंचं टेन्शन वाढणार, मविआला धक्का


 Video: अशोक चव्हाणांच्या सभेत राडा; मराठा बांधव आक्रमक, सभा थांबवून स्वीकारलं निवेदन