Shehzad Poonawalla: पीएम मोदींच्या खंद्या समर्थकाचा पक्षाला रामराम, शहजाद पूनावालांचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावरून 'भाजप' शब्द हटवला
Shehzad Poonawalla: भारतीय जनता पक्षाची बाजू विविध माध्यमांवर आक्रमकपणे मांडण्यासाठी ओळखले जाणारे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

Shehzad Poonawalla: शुक्रवार सकाळपासून राष्ट्रीय राजकारणात एका अनपेक्षित आणि खळबळजनक घडामोडीची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाची (BJP) बाजू विविध माध्यमांवर आक्रमकपणे मांडण्यासाठी ओळखले जाणारे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला (Shehzad Poonawalla) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी (Resignation) दिली आहे. पूनावाला यांनी गुरुवारी संध्याकाळी पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा सादर केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, त्यांच्या या तडकाफडकी राजीनाम्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Shehzad Poonawalla: 'एक्स' प्रोफाईल बायो बदलले; 'भाजप' शब्द हटवला
राजीनाम्याच्या वृत्तानंतर शहजाद पूनावाला यांनी आपल्या 'एक्स' हँडल्सवरील प्रोफाईल बायोमध्ये तातडीने बदल केले आहेत. त्यांनी आपल्या बायोमधून 'भाजप' हा शब्द पूर्णपणे हटवला आहे. नवीन बायोमध्ये त्यांनी स्वतःची ओळख 'भारतीय' आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'आजीवन अनुयायी' अशी करून दिली आहे.
याशिवाय त्यांनी आपल्या 'एक्स' हँडलचे नाव बदलून 'शहजाद जय हिंद' असे केले असून, बायोमध्ये "धर्म इस्लाम, संस्कृती हिंदू आणि विचारधारा भारतीय" असा स्पष्ट उल्लेख केला आहे. हँडलचे नाव बदलल्यामुळे त्यांचे 'ब्लू टिक' सध्या काही काळासाठी 'अंडर रिव्ह्यू' अवस्थेत गेले आहे. पूनावाला हे आता दुसऱ्या कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याची शक्यता अत्यंत कमी मानली जात असून, त्यांनी थेट राजकीय संन्यास घेतल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
My updated bio : pic.twitter.com/qGG5s9WMOG
— Shehzad Jai Hind (@Shehzad_Ind) July 30, 2026
Shehzad Poonawalla: भाजपचे प्रभावी वक्ते आणि मोदींचे खंदे समर्थक
2017 साली काँग्रेस (Congress) पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेले शहजाद पूनावाला हे पक्षाच्या अत्यंत आक्रमक आणि प्रभावी वक्त्यांपैकी एक मानले जात होते. 2021 मध्ये त्यांच्यावर दिल्ली भाजपच्या (Delhi BJP) सोशल मीडिया विभागाच्या प्रभारीपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. टीव्ही चॅनेलवरील वादविवाद आणि सोशल मीडियावर भाजपची बाजू भक्कमपणे मांडत विरोधकांवर, विशेषतः राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांवर जोरदार हल्लाबोल करण्यासाठी ते ओळखले जातात.
Shehzad Poonawalla: भावाशी असलेले राजकीय मतभेद
शहजाद पूनावाला हे प्रसिद्ध राजकीय भाष्यकार तहसीन पूनावाला (Tehseen Poonawalla) यांचे धाकटे भाऊ आहेत. एकेकाळी या दोन्ही भावांमध्ये घनिष्ठ संबंध होते; मात्र वेगवेगळ्या राजकीय विचारधारा आणि मतभेदांमुळे त्यांच्यातील संबंधांत मोठा दुरावा निर्माण झाला. अलीकडच्या काळात दोन्ही भाऊ अनेकदा जाहीरपणे आणि टीव्ही डिबेट्समध्ये परस्परविरोधी भूमिका घेताना दिसून आले होते. दरम्यान, शहजाद पूनावाला यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. यावर भाजप पक्षश्रेष्ठींकडून आणि अधिकृत सूत्रांकडून काय प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद येतो, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Before You Go
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल





















