Shahsi Tharoor On Prophet Mohammad Row: भाजप नेत्यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सुरू झालेल्या गदारोळात आता पंतप्रधान मोदींनी मौन सोडले पाहिजे, असे लोकसभा खासदार आणि काँग्रेस नेते शशी थरूर म्हणाले आहेत. शशी थरूर म्हणाले की, भारत सरकारने अलिकडच्या वर्षांत इस्लामिक देशांशी संबंध मजबूत करण्यासाठी प्रभावी पावले उचलली असतील, परंतु आता हे संबंध कमकुवत होऊ शकतात. थरूर म्हणाले की, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्लामोफोबियाच्या वाढत्या घटनांवर मौन सोडले पाहिजे.


शशी थरूर यांनी 'पीटीआय-भाषा'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेक इस्लामिक देशांची नाराजी समोर आली आहे. मात्र पंतप्रधान मोदींनी या प्रकरणात हस्तक्षेप केला नाही, मात्र त्यांना याची दखल घ्यायला हवी होती. थरूर म्हणाले की, मला वाटत की, पंतप्रधान मोदींनी आपल्या देशातील द्वेषयुक्त भाषण आणि इस्लामोफोबिक घटनांवर मौन सोडण्याची हीच योग्य वेळ आहे.


शशी थरूर म्हणाले की, कोणत्याही राष्ट्राच्या प्रगती आणि विकासासाठी सामाजिक एकता आणि राष्ट्रीय सद्भावना आवश्यक आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास'च्या नावाखाली अशा घटना थांबवण्यासाठी आवाहन केलं पाहिजे. परराष्ट्र धोरणाच्या प्रभावावर थरूर म्हणाले की, विडंबना अशी आहे की, अलिकडच्या वर्षांत भारत सरकारने इस्लामिक देशांशी, विशेषत: आखाती देशांशी संबंध मजबूत करण्यासाठी प्रभावी पावले उचलली आहेत. पण अशा घटनांमुळे ते संबंध कमकुवत होतील.


देशातील ईशनिंदा कायद्यांबाबत थरूर म्हणाले की, इतर देशांतील अशा कायद्यांचा इतिहास त्यांच्या गैरवापराने भरलेला असल्याने मी अशा कायद्यांचे कौतुक किंवा त्यांचे समर्थनही करत नाहीत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनीही वादग्रस्त वक्तव्यानंतर पंतप्रधान मोदींनी मौन सोडले पाहिजे, असे म्हटले आहे. पी चिदंबरम म्हणाले की, पंतप्रधानांचे मौन धक्कादायक आहे, विरोधी पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, लेखक यांनी इस्लामोफोबिया संपवण्यासाठी सरकारला सावध केले होते, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष केले गेले, हे दुःखद आहे, असं ते म्हणाले.