Prophet Controversy: भाजपचे निलंबित नेते नवीन जिंदाल आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर त्यांनी कुटुंबासह दिल्ली सोडली आहे. जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू झाल्यानंतर त्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांनी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विधानाच्या समर्थनार्थ प्रेषित मोहम्मद यांच्याविरोधात टीका केली होती.
जिंदाल यांनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वी ते एका व्यक्तीला भेटायला गेले असता काही लोक त्यांचा पाठलाग करत होते. याबाबत त्यांनी पोलिसांनाही माहिती दिली. अज्ञात व्यक्तींनी कथितरित्या त्याच्या घराची चाळण केल्याच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत असल्याने पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.
नवीन जिंदाल यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “माझी सर्वांना पुन्हा नम्र विनंती आहे की माझ्या आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांबद्दलची कोणतीही माहिती कोणाशीही शेअर करू नका. माझ्या विनंतीनंतरही अनेक लोक माझ्या राहत्या घराचा पत्ता सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत, इस्लामिक कट्टरवाद्यांपासून माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे.''
नवीन जिंदाल यांना सातत्याने मिळत आहे धमक्या
नवीन जिंदाल यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, "आत्ताच मला आणि माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. धमकावणाऱ्या व्यक्तीने आम्हाला सकाळी 11:38 वाजता +918986133931 या क्रमांकावर कॉल केला आहे. मी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली आहे.'' दरम्यान, प्रेषित मुहम्मद यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशात निर्माण झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. शुक्रवारच्या नमाजानंतर देशभरात अनेक ठिकाणी निदर्शने सुरू झाली असून आंदोलकांनी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.