Ajit Pawar: निवडणुकीआधी काकांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली; जयंत पाटील पायउतार होण्याची विचारणा करताच अजित पवारांच्या कृतीनं लक्ष वेधलं
Ajit Pawar: प्रदेशाध्यक्षपदाच्या बदलावरती अजित पवारांना बारामतीत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी बोलणं टाळलं असल्याचं दिसून आलं.

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षात मोठी नेतृत्व बदलाची घडामोड समोर आली आहे. जयंत पाटील यांनी अखेर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या जागी शशिकांत शिंदे येत्या मंगळवारी पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे. शशिकांत शिंदे 15 जुलै रोजी अधिकृतरित्या प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील यांनी पक्ष नेतृत्वासमोर आपल्या पदमुक्तीची विनंती केली होती. 10 जून रोजी पक्षाच्या वर्धापन दिनी, सार्वजनिकरित्या त्यांनी ही मागणी करत म्हटलं होतं की, "मला पवार साहेबांनी सात वर्षे संधी दिली. आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची गरज आहे, त्यानंतर आता नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी पक्षफुटीच्या आधी प्रदेशाध्यक्षपद अजित पवारांना हवं असल्याची चर्चा होती, मात्र त्यांना ते मिळालं नाही, त्यानंतर पक्षाचे दोन भाग झाले, त्यानंतर आताच्या या प्रदेशाध्यक्षपदाच्या बदलावरती अजित पवारांना बारामतीत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी बोलणं टाळलं असल्याचं दिसून आलं.
अजित पवारांनी तिथून घेतला काढता पाय
आज अजित पवार बाराममती दौऱ्यावरती आहे, ते वेगवेगळ्या मुद्द्यांवरती माध्यमांना प्रतिक्रिया देत होते, त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या बदलाबाबत प्रश्न विचारतात अजित पवारांनी तिथून काढता पाय घेतल्याचं दिसून आलं. अजित पवारांनी या प्रकरणी बोलणं टाळलं आहे.
छगन भुजबळांची प्रतिक्रिया
जयंत पाटील पदावरून पाय उतार झाले असतील, त्याबाबतीत मला माहिती नाही, ही नवीनच बातमी आहे, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.
शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद मिळणार असल्यासंदर्भातील बातमी सोमर येताच शशिकांत शिंदे यांनी एबीपी माझा सोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटलं की, प्रदेशाध्यक्षपदाबाबत अजून नाव निश्चित नाही, पवार साहेब, सुप्रिया ताई, जयंत पाटील आणि पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल. 15 तारखेला पक्षाची बैठक आहे, काही नावं चर्चेत आहेत, माझंही नाव चर्चेत आहेत. ज्यावेळेला निर्णय होईल, निवड होईल त्यावेळी निश्चितपणानं काम करु, असं शशिकांत शिंदे म्हणाले. शशिकांत शिंदे पुढं म्हणाले, आणखी कुणाची नावं चर्चेत आहेत याबद्दल कल्पना नाही. मला तुमच्याकडून कळलेलं आहे. संघटनेच्या माध्यमातून पवारसाहेबांनी या महाराष्ट्रात इतिहास घडवला काम केल, पक्ष संघटना बांधली आहे. आज पक्षाच्या माध्यमातून काम करण्याच्या बाबतीत संघर्षाचा काळ आहे. त्यावेळेला निश्चितपणानं लोकांना अपेक्षित अशा प्रकारचं नेतृत्व पवार साहेबांनी उभं केलेलं आहे. जयंत पाटील यांच्या सारख्या अध्यक्षांनी ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे, त्याची तुलना होऊ शकत नाही, असंही शिंदे यांनी म्हटलं. प्रदेशाध्यक्षपदाबाबत पक्षाचा अजून निर्णय झालेला नाही, पक्षाची बैठक आहे एवढाच निरोप आलेला आहे. निर्णय काय होईल तो होईल, पक्ष बांधण्याच्यासाठी संघर्षात आम्ही एकजुटीनं, एकोप्यानं उभं राहू, साहेबांच्या पक्षाची प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न 100 टक्के करु, असं शशिकांत शिंदे म्हणाले.
कोण आहेत शशिकांत शिंदे?
शशिकांत शिंदे हे मूळचे जावळी तालुक्यातील हुमगाव येथील रहिवासी आहेत. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर असून माथाडी कामगारांचे प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1963 रोजी झाला. वडील जयवंतराव शिंदे आणि आई कौसल्या शिंदे यांच्या सुसंस्कृत आणि प्रेमळ वातावरणात त्यांचे बालपण गेले.
लहान वयातच समाजकारण आणि राजकारणात ते सक्रिय झाले. 1999 साली शशिकांत शिंदे यांनी प्रथम जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि 12,000 मतांच्या फरकाने विजय मिळवला. त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे जलसंपदामंत्री म्हणून काम पाहिले आहे. 2009 ते 2014 या कालावधीत त्यांनी कोरेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून काम केले. या निवडणुकीत त्यांनी शालिनीताई पाटील यांचा पराभव केला होता.
शिंदे हे दोन पंचवार्षिक जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले असून त्यानंतर दोन पंचवार्षिक कालावधीसाठी कोरेगावचे आमदारही होते. मात्र, 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव महेश शिंदे यांनी केला. त्यानंतर शिंदे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून भाजपच्या महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. सध्या शशिकांत शिंदे हे विधान परिषद आमदार आणि शरद पवार गटाचे मुख्य प्रतोद आहेत. आता त्यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार आहे.























