Sharad Pawar, Supriya Sule on Majha Mahakatta: मुंबई : एबीपी माझाच्या महाकट्ट्यावर (Majha Mahakatta) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharadchandra Pawar Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांच्या कन्या, खासदरा सुप्रीया सुळे (Supriya Sule) उपस्थित होते. या बापलेकीच्या जोडीनं कार्यक्रमात बोलताना बापलेकीच्या हळव्या नात्यासोबतच राजकारणातल्या (Maharashtra Politics) अनेक गमतीजमती सांगितल्या. तसेच, अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्यही केलं. सुप्रीया सुळेंच्या लहानपणापासून ते त्यांचं शिक्षण, त्यांचं लग्न, त्यांची राजकारणातील इनिंग यासगळ्याबाबत मनमोकळ्या गप्पा शरद पवारांनी मारल्या. माझा महाकट्ट्यावर बोलताना शरद पवारांनी ते कोणत्या मंदिरात जातात हेदेखील सांगितलं. तसेच, बीड (Beed) आणि जालना (Jalna) जिल्ह्यातली स्थिती चिंताजनक असून दोन्ही जिल्ह्यांचा दौरा करणार असल्याचंही सांगितलं. 


शरद पवार बोलताना म्हणाले की, मी दोन मंदिरात जातो. तसेच, त्यांनी पुढे बोलताना दोन मंदिरांची नावंही सांगितली. ते म्हणाले की, मी दोन मंदिरात जातो, एक पंढरपूरला आणि एक बारामतीत. कन्हेरी म्हणून गाव आहे. तसेच, वडिलांपाठोपाठ श्रद्धेबाबत बोलताना सुप्रीया सुळेंनीही भाष्य केलं. माझी श्रद्धा आहे, पण अंधश्रद्धा नाही, असं सुप्रीया सुळे म्हणाल्या. 


बीड आणि जालना जिल्ह्यातली स्थिती चिंताजनक, दोन्ही जिल्ह्यांचा दौरा करणार : शरद पवार 


बीड आणि जालना जिल्ह्यातली स्थिती चिंताजनक आहे, संसदेचं अधिवेशन संपल्यावर आपण या दोन जिल्ह्यात जाऊन दोन्ही गटांशी संवाद साधू, असं शरद पवार म्हणाले. राज्यात प्रथमच दोन गट पडले आहेत. आजच्या राज्यकर्त्यांनीही दोन बाजू घेतल्या आहेत, हे योग्य नाही, अशी टीका पवारांनी केली. माझा महाकट्टा या विशेष कार्यक्रमात शरद पवारांनी ही भूमिका मांडली आहे. 


राजकारणात तिरका चालणारा उंट कोण? हे लक्षात ठेवावं लागतं : शरद पवार 


मी बुद्धीबळ फार चांगलं खेळतो असं नाही, वेळ मिळाला की खेळतो. उंट तिरका चालतो, राजकारणात उंट कोण हे लक्षात ठेवावं लागतं, अडीच घरं चालणारा घोडा आपल्या बाजूला कोण आहे हे लक्षात ठेवावं लागतं, असं शरद पवार म्हणाले. 


दरम्यान, आज दिवसभर एबीपी माझावर गप्पांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. आज सकाळी दहा वाजल्यापासून एबीपी माझावर 'माझा महाकट्टा' कार्यक्रमांचं प्रसारण केलं जाणार आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातल्या नामवंताशी मनमोकळा संवाद साधला जाणार आहे. तसेच, माझा कट्ट्याचा 12 वर्षांचा प्रवासाचा हा महासोहळा दिवसभर एबीपी माझावर पाहता येणार आहे.