मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपद पदावरुन जयंत पाटील पायउतार झाल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. पक्षप्रमुख शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांची घोषणा केल्यानंतर शरद पवारांनी आपल्या भाषणात शशिकांत शिंदे (Shashikant shinde) यांच्यावर जबाबदारी का दिली हे सांगितलं, तर जयंत पाटील यांच्या कार्यकाळातील कामाचं आणि त्यांनी पार पाडलेल्या जबाबदारीचं कौतुक केलं. जयंत पाटील यांनी 7 वर्षे राष्ट्रवादीचं (NCP) नेतृत्व केलं, अडचणीच्या काळातही त्यांनी नेतृत्व केलं. गेली अनेक वर्ष अहोरात्र कष्ट केले, साथ दिली असे शरद पवारांनी (Sharad pawar) म्हटले. यावेळी, शशिकांत शिंदेंना जबाबदारी देत त्यांच्या वडिलांच्या आणि त्यांच्या भूतकाळातील आठवणी जागवल्या. माथाडी कामगाराचा मुलगा आपल्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झाल्याचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला.
शरद पवार म्हणाले मला आनंद आहे की, शशिकांत शिंदे यांना नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली आहे. शशिकांत शिंदे यांनी उल्लेख केला माथाडी कामगाराचा मुलगा, लिपिकाचं काम करणारा हा कार्यकर्ता माथाडी कामगारातून तयार झाला. मी पहिल्यांदा 1965 साली मुंबईला आलो, त्या आधी मी मुंबई पाहिली नव्हती. त्यावेळी मी सांगोल्याच्या मित्रांसोबत राहत होतो. शशिकांत शिंदेंचे वडील गोदीत काम करत होते, त्यावेळी मी गोदी पहिली. प्रचंड कष्ट करणारा माथाडी कामगार पाहिला मिळाला. माथाडी बोर्डात काम करणाऱ्यांमध्ये शशिकांत शिंदे होते. सामान्य माणसांच्या विचारांशी निष्ठा, यासोबत कधीही तडजोड केली नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काम केलं, संघर्ष असा म्हणजे कधीही संघर्षाला सामोरे जा म्हणालो कधीही माघार घेतली नाही.
शशिकांत शिंदेंचं कौतुक
लोकसभा निवडणुकीला मी म्हणालो सातारा कोण लढणार? मला शशिकांत म्हणाले लढतो. तुम्ही सांगितलं तर लढतो, त्या निवडणुकीत यश आलं नाही. मात्र, त्याने संघर्ष केला. त्यामुळे सध्या संघर्षाचा काळ आहे. त्यामुळे, संघर्ष करणाऱ्या व्यक्तीला आपण संधी दिली आहे. पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुन्हा उभा राहील. कारण, विचाराने काम करणे ही त्यांची खासियत आहे, असे म्हणत शरद पवारांनी शशिकांत शिंदेचं कौतुक केलं.
जयंत पाटलांनी धैर्याने जबाबादारी पार पाडली
विधानसभेची निवडणूक होती मी जयंत पाटील यांच्या गावी गेलो, त्यावेळी त्यांचे वडील गेले होते. मी त्यांना बाजूला घेऊन सांगितलं तुम्हाला निवडणूक लढावी लागेल. त्यानंतर लगेच ते महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय झाले आहे. मंत्रिमंडळ बनवताना मी जयंत पाटील यांना म्हणलो तुम्हाला अर्थ खात्याचे मंत्री व्हाव लागेल. ते म्हणाले एकदम अर्थ खात कसं काय? मी म्हणलो, तुमच्यात ती धमक आहे, तुम्ही करू शकाल. त्यानंतर, 9 वेळा त्यांनी अंदाजपत्रक मांडलं. महाराष्ट्रात संकट आलं, त्यावेळी जयंत पाटील यांना गृहखात्याची जबाबदारी देण्यात आली होती, त्यांनी ती स्वीकारली आणि धैर्याने ती जबाबदारी पार पाडली, अशी आठवणही शरद पवारांनी सांगत जयंत पाटील यांच्या कामाचं कौतुकही केलं.
मग कसा पक्ष उभा राहत नाही ते पाहूयात
आपण ज्यांना शक्ती दिली ते सत्तेत सहभागी झाले. आज महाराष्ट्रात संकट आहे, आपण त्याला सामोरे जाऊयात. आज एक गृहस्थ मला भेटले, टीव्हीवर एक चित्र आलं. लातूरमध्ये एक शेतकरी आणि त्याची बायको नांगरत होती. ज्याची बायको नांगर हातात धरती आणि जो नांगरतो त्यांच्यावर 40 हजार रुपयांचं कर्ज आहे. त्या कार्यकर्त्याने मला सांगितलं मी ते कर्ज भरून आलो. मी म्हणालो हे का केलं? तर तो म्हणाला मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, शरद पवारांनी कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा असा किस्सा देखील सांगितला. महाराष्ट्राचे दौरे करा, राज्यातील तालुका-तालुक्याची परिस्थिती समजून घ्या. ओबीसी संघटनेचे अध्यक्ष राज राजापूरकर यांनी तालुका-तालुक्याचा अहवाल मला आणून दिला आहे. प्रत्येकाला हे करायचं आहे. आपल्याला गावागावात जायचं आहे, काम करायचं आहे, मग कसा पक्ष उभा राहत नाही पाहूयात, असे म्हणत शरद पवारांनी पुन्हा एकदा नव उभारणीची तुतारी फुंकली आहे.
जयंत पाटलांचा हात खांद्यावर
माझे सहकारी, विधान परिषदेचे सदस्य शशिकांत शिंदे यांची महाराष्ट्र प्रदेश, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल त्यांचे मनःपुर्वक अभिनंदन. आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या विचारांवर चालणार्या पक्षाचा "सर्वसामान्य कार्यकर्ता" हा गाभा आहे. मागच्या काळात आपला पक्ष तळागाळापर्यत पोहोचवण्याचे काम आपण सर्वांनी मिळून केले. आपण हा पक्ष त्यापेक्षा अधिक बळकट कराल असा मला विश्वास आहे, असे म्हणत जयंत पाटील यांनी शशिकांत शिंदेंना पक्ष कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे जयंत पाटील यांनी शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर हात ठेवल्याचा फोटोही सोशल मीडियातून शेअर केला आहे.