पुणे: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित महायुतीला शह देण्याची सर्वाधिक ताकद राखून असलेले शरद पवार यांनी आपले राजकीय फासे टाकायला सुरुवात केली आहे. शरद पवार (Sharad Pawar) हे प्रत्यक्ष लोकसभा निवडणूक लढवत नसले तरी महायुतीच्या उमेवारांविरोधात कशाप्रकारे मोर्चेबांधणी करता येईल, त्यादृष्टीने त्यांचा अनुभव महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठी शरद पवार नेहमीप्रमाणे ठिकठिकाणी फिरुन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. एकीकडे बारामतीमधील (Baramati Loksabha) प्रचारावर लक्ष ठेवून राहणे आणि दुसरीकडे आपल्या पक्षाचे उमेदवार निश्चित करणे, अशी दुहेरी जबाबदारी शरद पवार यांच्यावर आहेत. अशातच आता राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची विनंती केली आहे.


शरद पवार यांनी पुण्यातील मोदीबागेत त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांनी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी लोकसभेचे जागावाटप आणि सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले की, पक्षाचे कार्यकर्ते मला माढा, सातारा किंवा पुणे लोकसभा मतदारसंघातून (Pune Loksabha) लढवण्यासाठी आग्रह करत आहेत. पण मी माझ्या राजकीय आयुष्यात मी १४ निवडणुका लढलो, आता किती निवडणुका लढू? आता माझी निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.


माढ्यात शरद पवार 'मास्टरस्ट्रोक'च्या तयारीत! रणजित निंबाळकरांच्या विरोधात थेट विजयसिंह मोहिते पाटील निवडणुकीच्या रिंगणात? 


शरद पवार यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे शरद पवार यांची प्रत्येक कृती किंवा राजकीय वक्तव्य हे तोलूनमापून केलेले असते. आपल्या वक्तव्याचा काय अर्थ काढला जाऊ शकतो, याचीही त्यांना पुरेपूर जाण असते. त्यामुळे शरद पवार यांनी नेमके आताच ऑफ द रेकॉर्ड गप्पांमध्ये 'मला कार्यकर्ते लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह धरत आहेत', असे वक्तव्य का केले असावे, याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. कार्यकर्त्यांचा मान राखून शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवायचे ठरवलेच तर पुण्यात त्यांच्यासमोर भाजपचे मुरलीधर मोहोळ, तर माढ्यात त्यांच्यासमोर रणजितसिंह निंबाळकर आणि साताऱ्यात त्यांना भाजपच्या उदयनराजे भोसले यांच्याशी लढत द्यावी लागेल. तसे घडल्यास महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी रंगत येण्याची शक्यता आहे. 


आणखी वाचा


शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक! विनायक मेटेंच्या पत्नी करणार शरद पवार गटात प्रवेश, बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे?