मुंबई : विधानसभा निवडणुका जवळ येत असतानाच राज्यातील राजकीय आरोप प्रत्यारोप आणि गाठीभेटींची राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा होत आहे. त्यातच, आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. या भेटीत राज ठाकरेंनी राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली, तर शरद पवार यांनी 8 दिवसांत दोनवेळा मुख्यमंत्र्यांनी भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे मुंबईतील धारावी (Dharavi) झोपडपट्टीच्या पुनर्वसनाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि काँग्रेसने तीव्र विरोध केला आहे. मात्र, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे, आजच्या भेटीत या प्रकल्पावर चर्चा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, शरद पवार यांनीच याबाबत खुलासा केला आहे.
शरद पवार यांनी गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा केली होती. मागील भेटीत मराठा-ओबीसी आरक्षण हा विषय होता, तसेच दुधाचा प्रश्,न विरोधी पक्षातील नेत्यांच्या साखर कारखान्याला कर्ज न देणे हाही विषय बैठकीत चर्चेला होता. आता, महाविकास आघाडीत धारावी प्रकल्पावरुनच मत भिन्नता असल्याचं समोर आलं आहे. एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे धारावी प्रकल्पाला विरोध करत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत धारावी रीडेव्हलपमेंट प्रकल्पाबाबत बैठक केल्याची माहिती माध्यमांत आली होती. त्यावर, शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
विशेष म्हणजे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर या प्रकल्पाबाबत प्रेझेंटेशन झालं असल्याची बाब सुत्रांनी दिली. त्यामुळे या विषयावरून महाविकास आघाडीत मत भिन्नता तर नाही ना अशी चर्चा समोर आली आहे. या विषयासंदर्भात एबीपी माझाने थेट शरद पवार यांच्याशी संवाद साधला असता, अशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांसोबतची माझी बैठक संपली, त्यानंतर मी वर्षा निवासस्थानाबाहेर निघत असताना अदानींशी संबंधित काही व्यक्ती येथे आल्याची माहिती देखील शरद पवार यांनी दिली आहे. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांची शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप स्पष्ट झालं नाही.
साखर कारखान्याबाबत आमदारांची नाराजी
दरम्यान, मागच्या भेटीत, साखर कारखान्यांबाबत कुणाच्याही कारखान्यावर अन्याय होणार नाही, असं आश्वासन शरद पवारांना मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं होतं. मात्र, तरीदेखील राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे आमदार अशोक बापू पवार, काँग्रेस आमदार संग्राम थोपटे आणि विधानपरिषदेची निवडणूक लढलेले अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्या कारखान्याला कर्ज नाकारण्यात आलं. त्यामुळे, शरद पवारांनी प्रेमाने सांगून जर मागणी मान्य होत नसतील तर आम्ही संघर्ष करू, अशी भूमिका या आमदारांनी घेतली होती.