Parinay Phuke on Sanjay Raut नागपूर : सचिन वाझे (Sachin Vaze) हे मुळात शिवसेनेचे कार्यकर्ता होते. उद्धव ठाकरेंच्या(Uddhav Thackeray) हस्तेच वाझेंचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला होता. त्यावेळेस मग त्यांच्या लक्षात आलं नाही का, की वाझे कोणत्या पक्षाचे प्रवक्ता आहे म्हणून. सत्यता जाणून घेण्यासाठी वाझेंची ही नार्कोटेस्ट करा, अशी मागणी भाजपचे विधानपरिषदेचे आमदार परिणय फुके (Parinay Phuke) यांनी केली आहे.
संजय राऊतांनाही (Sanjay Raut) या संपूर्ण व्यवहारात त्यांचं नाव असावं, अशी भीती त्यांना आहे. म्हणून ते असे बेताल वक्तव्य करत असतील, असा टोला डॉ. फुके यांनी संजय राऊत यांना लगावला. संजय राऊत यांनी भाजपकडे चांगले प्रवक्ते नसल्याने कारागृहात असलेल्या वाझेंचा वापर भाजपला करावा लागत असल्याची टीका केली होती. यावर बोलताना आमदार डॉ. फुके यांनी हे भाष्य केलं आहे.
सचिन वाझेंना पोलीस सेवेत परत कोणी घेतलं?
संजय राऊत हे स्वतः अनेक दिवस कारागृहात होते आणि कारागृहातून ते जामिनावर बाहेर आलेत. त्यामुळे त्यांनीही जेव्हा ते कारागृहात असताना, हॉस्पिटलमध्ये जाताना अनेक स्टेटमेंट केलेत आणि त्यावेळेस ते का शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते म्हणून काम करीत होते का? या प्रकारचे काहीतरी बेताल वक्तव्य करणे आणि दिवसभर एकच एक विषय बोलणं, ही संजय राऊतांची सवय झालेली आहे. सचिन वाझेंना पोलीस सेवेत परत कोणी घेतलं? ते तर बडतर्फ झाले होते. अनेक वर्ष भ्रष्टाचार आणि बदमाशकी त्यांनी केली होती. यांचं सरकार आल्याबरोबर सर्वात पहिले यांनीच निर्णय घेताना वाझेंना पुन्हा सेवेत सामावून घेतलं. बडतर्फ झालेल्या एका पोलीस अधिकार्याला पुन्हा पोलीस सेवेत घेणं हे यांचेच कृत्य असल्याचेही आमदार परिणय फुके म्हणाले.
वाझेंच्या माध्यमातूनच सगळी वसुली होत होती
खासदार सुप्रिया ताईंना विनंती आहे की, ज्यावेळेस आपलं सरकार होतं आणि गृहखातं राष्ट्रवादीकडे होतं, त्यावेळेस बडतर्फ सचिन वाझेंना अपणाच पोलीस सेवेत सामावून घेतलं होतं. आपण, आपले पिताश्री, मंत्री अनिल देशमुख, संजय राऊत आणि सगळे मिळून त्याला परत पोलीस सेवेत घेतलं. वाझेंच्या माध्यमातूनच सगळी वसुली होत होती. वसुली करताना तुम्हाला गलिच्छ वाटलं नाही, तुम्हाला लाज वाटली नाही, असा सवालही आमदार परिणय फुके यांनी केलाय.
आज सचिन वाझे तुमच्यामुळे फसलांय, जेलमध्ये गेलाय आणि म्हणून तो आज तुमचे नावं घेत आहे. तुम्ही आज हे सगळं भीतीपोटी बोलत असल्याची टीकाही डॉ. परीणय फुके यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केली. खासदार सुप्रिया सुळे यांनी वाझे प्रकरणानंतर महाराष्ट्रात भाजप गलिच्छ राजकारण करत असल्याची टीका केली होती. यावर परिणय फुके यांनी पलटवार करत टीका केली आहे.