पुणे : सध्याच्या लोकसभा निवणुकीत (Lok Sabha Election) पवार कुटुंब वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. बंडखोरी करत राष्ट्रवादी (NCP) पक्ष फोडणाऱ्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महायुतीच्या (Mahayuti) जास्तीत जास्त उमेदवारांच्या विजयासाठी अजित पवार पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी अजित पवार यांच्याकडून बेरजेचे राजकारण केले जात आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांना शह देण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) हेदेखील वेगवेगळे डाव टाकत आहेत. त्यांनी बारामतीमध्ये नुकतेच एक भाष्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला गळती लागणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. 


बीड, बारामती मतदारसंघावर प्रतिक्रिया


पुढे बोलताना बीड आणि माढा लोकसभेच्या जागेवरही त्यांनी भाष्य केलं. माढा आणि बीड मतदारसंघाबाबत सगळ्यांची चर्चा झाली पाहिजे. चर्चा करूनच योग्य तो निर्णय होणार आहे, असे शरद पवार म्हणाले.   


अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लवकरच गळती?


अजित पवार गटातील धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बजरंग सोनवणे यांनी नुकतेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला चांगलाच धक्का बसला. असे असतानाच शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केलंय. आगामी काळात अजित पवार गटातील बरेच नेते परत येण्याची शक्यता आहे. महायुतीच्या उमेदवारांची घोषणा झाल्यावर ही इन्कमिंग आणखी वाढेल, असे पवार म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर वेगेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. भविष्यात अजित पवार यांच्या गटातील कोणकोणते नेते शरद पवार यांच्या गटात जाणार? असा प्रश्न विचारला जातोय


बीडमध्ये बजरंग सोनवणे यांना उमेदवारी?


अजित पवार यांची साथ सोडल्यानंतर बजरंग सोनवणे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तसे झाले तर बीडमध्ये पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे अशी लढत होणार आहे. शरद पवार जमेल त्या मार्गाने अजित पवार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत.  


केजरीवाल यांच्या अटकेनंतर भाजपावर टीका


शरद पवार 22 मार्च रोजी बारामतीतील माळेगाव येथे बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर भाष्य केलं. विरोधी पक्षाच्या लोकांवर ईडीची कारवाई केली जात आहे, असे म्हणत त्यांनी भाजपावर टीका केली.