कोल्हापूर: साधारण वर्षभरापूर्वी मी प्रत्यक्ष राजकारणात नव्हतो. पण मी कायम राजकीय मैदानाच्या वेशीवर उभा होतो. त्या दृष्टीकोनातूनच मी विचार करायचो. पण कोल्हापूरात सगळेजण आपापलं काम करत होते. सगळं चांगलं सुरु होतं. त्यामुळे वर्षभरापूर्वी मला राजकारणात येण्याची आवश्यकता वाटत नव्हती. पण कदाचित आता ती वेळ आली असेल, असे वक्तव्य छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांनी केले. छत्रपती शाहू महाराज यांना गुरुवारी काँग्रेसकडून कोल्हापूर लोकसभेची (Kolhapur Loksabha) उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी शुक्रवारी कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचे आभार मानले.
यावेळी शाहू महाराजांना तुमचा निवडणुकीच्या मैदानात न उतरण्याचा वर्षभरापूर्वीचा निर्णय अचानक बदलला कसा, असे विचारण्यात आले. यावर शाहू महाराजांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, मी स्वत:ला फार महत्त्व देऊ इच्छित नाही. पण वर्षभरापूर्वीचा माझा राजकारणात न उतरण्याचा माझा निर्णय मला बदलावा लागला. तेव्हा मला राजकारणात उतरण्याची आवश्यकता वाटत नव्हती. पण आता जनतेला वाटत असेल की, आपण एका स्तरावर आलो आहोत, जिथे माझी आवश्यकता आहे. हीच वेळ महाराजांनी लक्ष घालण्याची आहे, असे जनतेला वाटत असावे. त्यामुळे मी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे शाहू महाराजांनी सांगितले.
पुरोगाम्यांनी एकत्र येण्याची गरज: शाहू महाराज
आपल्या महाराष्ट्राला आणि कोल्हापूरला मोठा इतिहास आहे. हा इतिहास छत्रपती शिवरायांपासून सुरु होतो. त्यांनी केलेले कार्य, त्या काळात त्यांनी समाजाला दिलेली दिशा, अन्यायाविरोधात त्यांचा लढा आणि सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी केलेले काम, या सगळ्याचा आदर्श आपल्यासमोर आहे. आधुनिक काळात शाहू महाराजांनी समता आणि शिक्षणाच्यादृष्टीने महत्त्वाचे कार्य केले. तोच विचार कोल्हापूरच्या जनतेमध्ये रुजला आहे. याशिवाय, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचासरणीचा प्रभाव आहे. हाच विचार पुढे नेण्याचं काम मी करणार आहे. सगळ्या समाजाला पुढे घेऊन जाणे हे आपले कर्तव्य आहे, असे यावेळी शाहू महाराज यांनी म्हटले. तसेच सध्याच्या काळात पुरोगामी लोकांनी एकत्र येण्याची गरज शाहू महाराजांनी व्यक्त केली. पुरोगामी घटक एकट्याने लढले तर यशस्वी होणे कठीण आहे. त्यामुळे सर्व पुरोगामी पक्ष आणि घटकांनी एकत्र येण्याची गरज आहे, असेही शाहू महाराज यांनी सांगितले.
आणखी वाचा
शाहू महाराज आमच्या अस्मितेचा विषय, फक्त प्रचार नाही विजयी सभेलाही येणार; उद्धव ठाकरेंनी मशाल पेटवली!