NCP Sharadchandra Pawar first Candidate List : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP Sharad Pawar) उमेदवार यादी शनिवारी (दि.29) जाहीर करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे.
महाविकास आघाडीत शरद पवारांच्या वाट्याला किती जागा?
महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रस पक्षाने आत्तापर्यंत महाराष्ट्रातील 12 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 16 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शरद पवारांच्या वाट्याला महाविकास आघाडीत एकूण 10 जागा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शनिवारी शरद पवार किती उमेदवारांची यादी जाहीर करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
नगर, बारामतीचे उमेदवार जवळपास निश्चित
बारामतीतून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर होणार आहे. सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी प्रचारासाठी दौरे सुरु केले आहेत. साताऱ्यातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतल्याने बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी मिळू शकते. याशिवाय अहमदनगरमधून पारनेरचे आमदार निलेश लंके यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. आजच त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत लोकसभा लढणार असल्याचे निश्चित केले आहे.
माढा, बीडवरुन अजूनही सस्पेन्स
माढा मतदारसंघातून महादेव जानकर यांना पाठिंबा देऊन लोकसभा लढवण्याची तयारी शरद पवार गटाकडून सुरु होती. मात्र, जानकर यांनी महायुतीमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर धवलसिंह मोहिते पाटील यांना शरद पवार माढातून उमेदवारी देणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवाय, बीडमधून मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय बजरंग सोनवणे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या