मुंबई: बारामतीची महायुतीची जागा जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणा, तुम्ही सर्वांनी मतभेद विसरून नव्या उमेदीने कामाला लागा, इंदापूर तालुक्यातून जास्तीत जास्त लीड आपल्या उमेदवाराला मिळायला हवं असं आवाहन इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी (Harshvardhan Patil) त्यांच्या कार्यकर्त्यांना केलं आहे. इंदापूरबाबत योग्य ती भूमिका घेऊ, इंदापूरच्या सर्व निवडणुकांचं पालकत्व हे देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारलं असल्याचा शब्दही दिल्याचं त्यांनी सांगितलं. हर्षवर्धन पाटलांच्या या बदललेल्या भूमिकेमुळे अजित पवारांना मोठा दिलासा मिळणार आहे हे स्पष्ट झालंय. 


बारामती लोकसभा मतदारसंघातील झालेल्या तिढ्यावर देवेंद्र फडणवीसांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर हर्षवर्धन पाटलांनी आपली भूमिका जाहीर केली. ते म्हणाले की, आजच्या बैठकीत महायुती बाबत चर्चा झाली . प्रत्येक पक्षाने आपला महायुती धर्म पाळायला हवा होता. इंदापूरबाबत मी योग्य ती भूमिका घेऊ.


इंदापूरच्या निवडणुकीचं पालकत्व देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारलं


आम्ही आज त्यांचे काम करू, पण नंतर त्यांनी आमचे काम करावे असा आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचं हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं. ते म्हणाले की आज आम्ही महायुतीचे काम करायचो, पण नंतर ते आपलं काम करणार नाहीत असं व्हायला नको. आगामी सर्व निवडणुकामध्ये इंदापूरचे पालकत्व देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले आहे. आपले जे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न फडणवीस करतील. 


विजय शिवतारें यांच्यानंतर हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले


विजय शिवतारे यांच्या नंतर आता इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलल्याने अजित पवारांसमोरील मोठी अडचण दूर झाल्याचं दिसतंय. कारण गेल्यावेळच्या लोकसभेला राष्ट्रवादीला पाठिंबा देऊनही विधानसभेला आपल्याविरोधात काम करून पाडण्यात आल्याचा आरोप हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांवर केला होता. तर विधानसभेला आमचं काम करणार असाल तरच लोकसभेला तुम्हाला मदत करू असा इशारा अंकिता पाटलांनी दिला होता. 


अजित पवारांच्या विरोधात हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या समर्थकांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी या आधीही बैठक घेतली होती. देवेंद्र फडणवीसांकडून आश्वासन मिळाल्यानंतर आता हर्षवर्धन पाटलांचा सूर काहीसा बदलल्याचा दिसतोय. बारामती लोकसभेमध्ये महायुतीच्या उमेदवाराला मोठं मताधिक्य द्या असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. 


ही बातमी वाचा: