पुणे : एकीकडे पंढरीच्या वारीचा उत्साह सुरू असताना दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या वारीतील सहभागावरुन राजकारण तापल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) हे वारीत सहभागी होणार असल्याचे वृत्त झळकल्यानंतर इतरही राजकीय नेत्यांची वारीत सहभागी होण्यासाठी स्पर्धा सुरूच झाल्याचं दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेतूनच, आपण वारीत सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार, अजित पवार (Ajit Pawar) आज वारीतील पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. दुसरीकडे शरद पवार हेही बारामती दौऱ्यावर असून त्यांनी आपल्या भाषणातून वारीवर (Pandharichi wari) भाष्य केलं. वारीचं महत्त्व सांगत अजित पवारांच्या वारीतील सहभागावरुन टोला लगावला.

  


शरद पवार यांनी कन्हेरीतील मारुती मंदिर आणि वारी परंपरेची माहिती देत पालखी सोहळ्यावर भाष्य केलं. कान्हेरी येथे मारुती मंदिर आहे, या मंदिरात अखंड विना घेऊन मार्गदर्शन करतात. सोनोपंत दांडेकर हे संत विचार लोकांपर्यंत पोहोचवत होते, तब्बल 800 वर्षांपासून माणुसकीच्या माध्यमातून संत विचारांचा संदेश दिला जातो. जातीभेद इथे नसतो, आपल्या संतांचा विचार महाराष्ट्रा पुरता मर्यादीत नाही, असे म्हणत शरद पवारांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्‍यांची आठवण सांगितली. 


प्रकाशसिंह बादल हे पंजाबचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी मी केंद्रीयमंत्री होतो. ते माझ्याकडे आले आणि मला पांजबला यावं लागेल असं म्हणाले. कारण, नामदेव महाराजांचे स्मारक बांधण्यासाठी त्यांनी मला बोलावलं होतं. एखादा शीख व्यक्ती हे करतो, त्यांचा धर्म वेगळा तरी त्यांनी संतांचा विचार घेतला, असे शरद पवार यांनी सांगितले. आता रस्ते झाले आहेत, पण आधी नीटनीटके रस्तेही नव्हते. उणजी धरणाच्या उदघाटनाला यशवंतराव चव्हाण आले होते. आम्ही चंद्रभागा इथे आडवतो आहे, त्यातून पीक उभं राहील आणि त्या ज्वारीच्या दाण्यात पांडुरंगाचं दर्शन होईल, असेही शरद पवार यांनी म्हटले. 


ते हौशे, नवशे, गवशे


मी रशियात गेलो असताना तिथली एक महिला माझ्यासोबत मराठीत बोलत होती. त्यावेळी, मी वारी करते, असे मला त्या महिलेने सांगितलं. त्या वारीला पुण्यात आल्या तेव्हा मी त्यांना माझ्या घरी बोलावले होते. तेव्हा, तुम्ही वारी कुठून करता, असा प्रश्न पुण्यातील महिलेने त्यांना विचारला होता. त्यावर, ती रशियन महिला म्हणाली, वारी ही आळंदी ते पंढरपूर करायची असते. आधी-मधी जे वारी करतात, त्यांना हौशे नवशे गवसे म्हणतात, असे म्हण शरद पवारांनी अजित पवारांच्या अर्ध्या वारीवरुन खोचक टोला लगावला. 


अजित पवारांची पायी वारी


दरम्यान, अजित पवार यांनी आज संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह पायी सहभाग घेतला. बारामती ते काटेवाडी अशी पायी वारी त्यांनी केली. यावेळी, तुकोबा माऊली आणि पांडुरंगाच्या चरणी हेच मागितलं की, सर्वांनी सुखाने समाधानाने आनंदाने राहावं. सर्वांच्या अडचणी दूर व्हाव्यात, पाऊस काळ चांगला व्हावा. शेतकरी सुखी राहावा, असं साकडं पांडुरंगचरणी घातलं. कोणाला मदत लागत असेल तर, महायुतीमधील देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार केव्हाही तयार आहेत. वारीत कोणी सहभागी व्हायचं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. मी सहभागी झालो. आम्हाला वाटलं वारीत सहभागी व्हावं, त्यातून आनंद मिळतो. देशातला हा सर्वात आनंद देणारा सोहळा आहे. वारीत प्रत्येकाला यायचा अधिकार आहे, असेही अजित पवार यांनी म्हटले.