सोलापूर : लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यात बड्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदीही (Narendra Modi) आज कोल्हापुरातील महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेण्यासाठी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हेही पायाला भिंगरी लावल्यागत राज्यातील अनेक जिल्ह्यात फिरत आहेत. शरद पवारांनी शुक्रवारी सोलापूर दौऱ्यात माळशिरस आणि पंढपुरात (Pandharpur) सभा घेतली.शरद पवारांनी आपल्या सभेतून मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. मोदींकडून जातीय तेढ निर्माण करणारी भाषणं केली जात असल्याचा आरोप शरद पवारांनी पंढपुरातील सभेतून केला. दरम्यान, शरद पवारांनी आज सकाळी पंढरपुरात जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतले. यावेळी, पंढरपुरातील राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अभिजीत पाटील हेही त्यांच्यासमवेत उपस्थित होते. 


शरद पवार यांच्या आस्तिक किंवा नास्तिक असण्यावरुन नेहमीच चर्चा होत असते, गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचा पंढरपुरातील देवदर्शनाचे फोटोही व्हायरल झाले होते. त्यामुळे, सोशल मीडियातून त्यांच्या देव माननं किंवा न मानणं ह्यावरुनही चर्चा होत होती. त्यामुळे, शरत पवारांच्या पंढरपूर दौऱ्यात ते पांडुरंगाच्या दर्शनाला जातील की नाही, यावरुनही अटकले लढवली जात होती. मात्र, शरद पवारांनी सकाळी-सकाळी विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यावेळी, अभिजीत पाटील यांच्यास स्थानिक नेतेही त्यांच्यासमवेत होते. दरम्यान, 15 मार्चपासून पुढील दीड महिन्यांसाठी विठ्ठलाचे पायावरचे दर्शन म्हणजे गाभाऱ्यातून दर्शन घेता येणार नाही. दिवसभरात सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत असे केवळ पाच तास मुखदर्शनाची सुविधा उपलब्ध आहे. विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, शरद पवारांनीही आज मुखदर्शन घेऊन पांडुरंगाला साकडे घातले. 


शरद पवारांनी पंढरपूरच्या सभेत सोलापूर जिल्ह्याच्या आठवणी जागवल्या. सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी काम पाहिल्याची आठवण सांगताना जुन्या आणि नव्या पिढीतील राजकारणावर भाष्य केले. तसेच, सध्या देशात असलेल्या मोदी सरकारच्या धोरणांवरही त्यांनी टीका केली. देशाची सत्ता नरेंद्र मोदी नावाच्या गृहस्थांच्या हाती आहे. लोकशाहीत सत्ता कोणालाही मिळते. ती लोकांसाठी चालवण्याचा अधिकार असतो. पण मिळालेली सत्ता जमीनीवर पाय ठेवून लोकांसाठी चालवायची भूमिका आज प्रत्येकाने घेतली पाहीजे. आज मोदींच्या हाती सत्ता असताना ते महाराष्ट्रात आणि देशात हिंसक भाषण देतात. जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी, राहूल गांधी यांच्यावर टिका करतात. तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहात. प्रधानमंत्री हा एका पक्षाची नाही तर संपूर्ण भारताचा असतो. त्यांनी प्रत्येक नागरिक हा आपला आहे, त्याचे आपण घटक आहोत, ही दृष्टी कायम ठेवली पाहिजे. पण जवाहरलाल नेहरूंवर टिका करण्यासाठी मोदी आपला वेळ घालवतात. ज्या जवाहरलाल नेहरुंनी स्वातंत्र्याआधी आयुष्याची अनेक वर्षे तुरुंगात घालवली आणि गांधींच्या विचाराने देशाला स्वतंत्र करून दाखवले, अशा शब्दात शरद पवारांनी मोदींवर हल्लाबोल केला. 


धर्माधर्मात अंतर निर्माण करण्याचं काम


देशाच्या स्वातंत्र्य लढाईनंतर संसदीय लोकशाही पद्धतीने आणि आधुनिक विज्ञानाचा आधार घेऊन हा देश पुढे नेण्याचा आणि देशाचा नावलौकीक जगात करण्याचे ऐतिहासिक काम नेहरूंनी केले. त्यांच्यावर टिका करण्याचे काम तुम्ही करता. तुम्ही प्रधानमंत्री म्हणून सर्वांना घेऊन चालले पाहिजे, पण ती भूमिका त्यांची नाही. काही दिवसांपूर्वीही त्यांनी एका ठिकाणी भाषण केलं. त्यात जाती जातीत, धर्माधर्मात अंतर निर्माण होईल असे भाष्य केले. अनेक प्रकारची टिकाटिप्पणी त्यांनी केल्याचंही शरद पवारांनी म्हटलं.


हेही वाचा


कोल्हापुरात लँडींगपूर्वीच मोदींचं शेतकऱ्यांना मोठ्ठं गिफ्ट; कांदा निर्बंध उठवले, 6 देशात निर्यातीला परवानगी