Sharad Pawar on Sangram Thopate : "संग्राम थोपटे (Sangram Thopate) तुम्ही या तालुक्यासाठी, राज्यासाठी, देशासाठी जे काही कराल त्यासाठी मी तुमच्या मागे राहीन. या आधी आपले रस्ते वेगळे असतील किंवा नसतील पण तुम्ही आमच्या सोबत रहा", असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी संग्राम थोपटे यांना केलं आहे. शिवाय,यावेळी शरद पवारांनी लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. भोर येथे महाविकास आघाडीची सभा पार पडली. यावेळी शरद पवार बोलत होते.
शरद पवार आणि थोपटे कुटुंबीयांमध्ये 40 वर्षांपासून राजकीय संघर्ष
शरद पवार आणि संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे यांच्या दरम्यान, गेल्या 40 वर्षांपासून राजकीय संघर्ष सुरुच होता. काँग्रेसमध्ये असूनही शरद पवार आणि अनंतराव थोपटे हे राजकीय विरोधक होते. हे राजकीय वैर पवार कुटुंबियांच्या पुढील पिढीतही आले. अजित पवार आणि संग्राम थोपटे यांच्यामध्येही राजकीय संघर्ष वाढीस लागला. मात्र, आता राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर शरद पवारांनी नवी खेळी करत थोपटे कुटुंबियांसोबतचा 40 वर्षांपासूनचा संघर्ष संपवत नवी सुरुवात करण्याचे आवाहन केले आहे.
मी तुमच्यासमोर सुप्रियाचे नाव उमेदवार म्हणून जाहीर करतोय
शरद पवार म्हणाले, आज मी तुमच्यासमोर सुप्रियाचे नाव उमेदवार म्हणून जाहीर करतोय. सुप्रिया सुळे यांचे संसदेतील काम बोलक आहे. संग्राम थोपटे तुम्ही या तालुक्यासाठी, राज्यासाठी, देशासाठी जे काही कराल त्यासाठी मी तुमच्या मागे राहीन. या आधी आपले रस्ते वेगळे असतील किंवा नसतील पण तुम्ही आमच्या सोबत रहा. शरद पवार पाठिशी असल्यावर विकास काय असतो हे मी तुम्हाला दाखवून देईन.
मोदी फक्त गुजरातचा विचार करतात
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, मोदी फक्त गुजरातचा विचार करतात. ते इतर साधन संपत्ती हिसकावून गुजरातला नेतात. गुजरातबद्दल आम्हाला आस्था आहे. पण इथले नुकसान करुन गुजरातला फायदा केला जातोय. जो व्यक्ती राज्याच्या बाहेर विचार करत नाही तो देशाचा पंतप्रधान होऊ शकत नाही.
देशात फक्त एक महिना पुरेल एवढा अन्नाचा साठा उपलब्ध होता
मी जेव्हा देशाचा कृषीमंत्री झालो तेव्हा देशात फक्त एक महिना पुरेल एवढा अन्नाचा साठा उपलब्ध होता. अनेक निर्णय घेऊन ही परास्थिती बदलली. एक दिवशी यवतमाळातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मी मनमोहनसिंग यांना भेटलो आणि त्यांना म्हटले की आपण या शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्याने आत्महत्या का केली हे पाहिले पाहिजे. आम्ही गेलो आणि कर्जबाजारीपणामुळे त्याने आत्महत्या केल्याच समजलं. त्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला.
महाविकास आघाडीचा पहिला उमेदवार जाहीर
गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन खलबतं सुरु आहेत. वंचित बहुजन आघाडीने जागा वाटपावरुन महाविकास आघाडीवर आरोप केले आहेत. दरम्यान आता, जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसतानाही शरद पवार यांनी आपल्या वाटेला येणाऱ्या जागेवर म्हणजेच बारामतीतून सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी : आज मी तुमच्यासमोर बारामतीचा उमेदवार जाहीर करतोय, शरद पवारांची भोरमध्ये मोठी घोषणा!