पुणे: सुप्रिया सुळेंचे संसदेतील काम बोलकं आहे, त्यामुळे आज मी तुमच्यासमोर बारामतीचा उमेदवार  (Baramati Loksbha Election) जाहीर करतो असं सांगत शरद पवारांनी (Sharad Pawar) सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा (Supriya Sule Candidate Of baramati Lok Sabha) केली आहे. संग्राम थोपटेंनी (Sangram Thopate) आपल्योसोबत राहावे, शरद पवार पाठिशी असल्यावर विकास काय असतो ते मी दाखवून देईन असंही ते म्हणाले. ते भोरमधील सभेत बोलत होते. 


सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील भोरमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी या सभेचं नियोजन केलं होतं. त्यामध्ये बोलताना शरद पवारांनी आपल्या पक्षाच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली. त्यामुळे बारामतीमध्ये आता सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे.


अनंतराव थोपटेंसोबतचा 40 वर्षांचा संघर्ष मिटवला


भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे वडील आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे आणि शरद पवार यांचा गेल्या 40 वर्षांपासून राजकीय संघर्ष आहे. त्यांचा हा संघर्ष पुढच्या पीढीमध्ये म्हणजे अजित पवार आणि संग्राम थोपटेंमध्येही असल्याचं दिसून येतंय. आता बदलत्या राजकारणाचा वेध घेत शरद पवारांनी भोरच्या सभेच्या आधी अनंतराव थोपटे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि हा 40 वर्षाचा संघर्ष मिटवला. त्यामुळे थोपटे यांचे वजन आता सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात पडणार हे निश्चित झालं असून त्यामुळे अजित पवारांची मात्र अडचण वाढणार असल्याचं दिसून येतंय. 


काय म्हणाले शरद पवार? 


मी जेव्हा देशाचा कृषीमंत्री झालो तेव्हा देशात फक्त एक महिना पुरेल एवढा अन्नाचा साठा उपलब्ध होता. अनेक निर्णय घेऊन ही परास्थिती बदलली. एक दिवशी यवतमाळातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मी मनमोहनसिंग यांना भेटलो आणि त्यांना म्हटले की आपण या शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्याने आत्महत्या का केली हे पाहिले पाहिजे. आम्ही गेलो आणि कर्जबाजारीपणामुळे त्याने आत्महत्या केल्याच समजलं. त्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यचा निर्णय घेतला.


मोदी फक्त गुजरातचा विचार करतात. ते इतर साधन संपत्ती हिसकावून गुजरातला नेतात. गुजरातबद्दल आम्हाला आस्था आहे, पण इथले नुकसान करुन गुजरातला फायदा केला जातोय. जो व्यक्ती राज्याच्या बाहेर विचार करत नाही तो देशाचा पंतप्रधान होऊ शकत नाही.


संजय राऊत आणि अनिल देशमुख यांना सत्तेचा दुरुपयोग करून तुरुंगात टाकलं. आज मी तुमच्यासमोर सुप्रियाचे नाव उमेदवार म्हणून जाहीर करतोय. सुप्रिया सुळे यांचे संसदेतील काम बोलकं आहे.  


 


संग्राम थोपटे तुम्ही या तालुक्यासाठी, राज्यासाठी, देशासाठी जे काही कराल त्यासाठी मी तुमच्या मागे राहीन. या आधी आपले रस्ते वेगळे असतील किंवा नसतील, पण तुम्ही आमच्या सोबत रहा. शरद पवार पाठिशी असल्यावर विकास काय असतो हे मी तुम्हाला दाखवून देईन.