पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या I.N.D.I.A. आघाडीच्या समावेशाबाबत मोठं भाष्य केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांना I.N.D.I.A. आघाडीत घ्यायचं की नाही याबाबत मतमतांतरं असताना, शरद पवारांनी स्पष्ट सांगितलं. शरद पवार म्हणाले, "प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे.I.N.D.I.A. आघाडीच्या बैठकीत मी स्वतः काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना  सांगितले की, प्रकाश आंबेडकर यांना आपल्यासोबत घेतले पाहिजे"


शरद पवारांनी आज पुण्यातील भीमथडी यात्रेला (Bhimthadi Jatra Pune) हजेरी लावली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवारांनी विविध विषयावर भाष्य केलं. यावेळी त्यांना प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला I.N.D.I.A. आघाडीमध्ये स्थान मिळणार की नाही याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. 


शरद पवार म्हणाले,"I.N.D.I.A. आघाडीची बैठक झाली, त्यावेळी मी स्वत: प्रकाश आंबेडकर यांना आपल्यासोबत घ्यायला हवं असं मत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सांगितलं" 


प्रकाश आंबेडकरांचा आरोप


दरम्यान, वंचित बहुजन आघाडीला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष India आघाडीमध्ये सहभागी करून घेत नसल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. अद्यापही इंडिया आघाडीत वंचितला सहभागी करून घेण्यासंदर्भात कुठली भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस घेत नसल्याचे किंवा कळवत नसल्याचं वंचित बहुजन आघाडीकडून सांगितलं होतं. आम्ही अजूनही इंडिया आघाडीकडून आम्हला सोबत घेतलं जाईल अशी अपेक्षा करत आहोत असं वंचित बहुजन आघाडीकडून काही महिन्यांपूर्वी म्हटलं होतं. 


सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल 


तिकडे सुजात आंबेडकर यांनी नांदेडमधील कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघात झालेल्या निर्धार मेळाव्यात I.N.D.I.A. आघाडीवर तुफान हल्ला चढवला होता. तुम्हाला संधी दिली होती पुन्हा रडत येऊ नका.. पुन्हा रडत आलात तर ठोकून काढू, असं सुजात आंबेडकर म्हणाले. "काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्र लिहून प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर अजूनही काँग्रेसने अजूनही निर्णय घेतला नाही. त्यावर सुजात आंबेडकरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.


वंचित आघाडीची बैठक


तिकडे वंचित आघाडीने 26 डिसेंबरला वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीची बैठक बोलावली आहे. प्रकाश आंबेडकरांनी राज्य कमिटीच्या सर्व सदस्यांची तातडीची बैठक बोलावली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 30 जागांवर पक्षाकडून निर्णय होण्याची शक्यता आहे.
वंचित बहुजन आघाडी आगामी लोकसभेच्या 30 जागांवर चर्चा करणार असून, त्यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.


प्रकाश आंबेडकर हे आजपासून नागपूर दौऱ्यावर आहेत. भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषद झाल्यानंतर उद्या नागपुरात राज्य कमिटीची बैठक बोलवली आहे. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीसोबत पत्र व्यवहार, जाहीरपणे सांगून एकत्र येण्याची इच्छा दर्शवली आहे. परंतु, वंचितच्या प्रयत्नांना कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ‘वंचित’ला आता यावर भूमिका घ्यावी लागत आहे, असं सूत्रांकडून सांगण्यात आलंय.


वंचित बहुजन आघाडीने काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून इंडिया आघाडीचा भाग बनण्याची इच्छा दर्शवली होती. परंतु, काँग्रेसकडून कुठलीही हालचाल होतांना दिसत नाही. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सक्रिय झालेली पाहायला मिळत आहे.


मागील 20 दिवसांत वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची ही दुसरी बैठक आहे. मागील बैठक 5 डिसेंबर रोजी मुंबईत झाली होती. यात लोकसभा निवडणुकीची रणनीती आणि रोडमॅप विषयी चर्चा झाली होती. 


Sharad Pawar Press Conference VIDEO :  शरद पवार यांची पत्रकार परिषद



 


संबंधित बातम्या  


Sujat Ambedkar On Congress INDIA Alliance : तुम्हाला संधी दिलीय, आता पुन्हा रडत आलात तर ठोकून काढू; सुजात आंबेडकरांचा इंडिया आघाडीला इशारा