Ajit Pawar on Sharad Pawar : कोरोनाचा (Coronavirus Updates) नवा व्हेरियंट धोकादायक नाही, त्याची तीव्रता कमी आहे, घाबरुन जाऊ नका, काळजी घ्या, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. तसेच, पुण्यात (Pune News) पाणी टंचाई जाणवणार नाही, पाण्याचं योग्य नियोजन करणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. त्यासोबतच माझ्यासोबत ज्यांना यायचं आहे, त्यांनी यावं, पक्षासाठी जे योग्य असेल ते माझ्यासोबत राहून करा, दोन्ही बाजूला राहू नका, एवढंच सांगायचं आहे, असंही अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे. 


उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "पाणी सर्वात आधी पिण्यासाठी राखीव ठेवा, मग शेतीसाठी वापरा. जुलैपर्यंत पाणी पुरेल असं पाण्याचं नियोजन करायचं आहे. गेल्या वर्षीच्या तुनेत पुण्यातील पाण्याची परिस्थिती बिकट आहे. संपुर्ण राज्यात पाण्याचा साठा कमी आहे." पुढे बोलताना एबीपी माझा आणि सी व्होटरनं केलेल्या सर्वेक्षणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, "सर्वेला काहीच आधार नसतो. विधानसभेच्या पाच राज्यांच्या निवडणुकांचे सर्वे तुम्ही आठवा आणि निकाल काय लागले तेसुद्धा आठवा. तुम्ही किती लोकांना विचारता आणि कुठल्या भागात सर्वे करता, यावर सर्वेचे निकाल अवलंबून असतात. त्यांनी सर्वे केलेला असला, तरी आमची तीन पक्षांची युती आहे. अजुन आमच्या हातात काही काळ आहे, त्यात आम्ही कुठे आणि कसं वातावरण हे महायुतीच्या बाजूला झुकेल असं काम करू."


आतातरी देशात नरेंद्र मोदींशिवाय पंतप्रधान पदाचा दुसरा कोणी उमेदवार नाही : अजित पवार 


वंचित आघाडीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, "महायुतीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्या विरोधात कोण उमेदवार आहे? जर तुम्ही विरोधकांकडून पंतप्रधान पदाचे उमेदवार सांगू शकत नाही, उभं राहण्याचा अधिकार सर्वांना आहे. जनता तुलना करेल आणि कोणाच्या नावासमोरचं बटण दाबायचं ते ठरवेल. मी स्पष्ट बोलतो, आतातरी देशात नरेंद्र मोदींशिवाय पंतप्रधान पदाचा दुसरा कोणी उमेदवार पाहायला मिळत नाही."


मी काय भाषण करायचं त्यावर तुम्ही टीका टिप्पणी करु नका : अजित पवार 


"माझ्या मतदारांशी मी काय बोलावं, तो माझा अधिकार, तुम्ही माझं ऐकू नका, मी त्यांना आवाहन केलं आहे माझं ऐका म्हणून. मी मतदारांना आवाहन केलेलं नाही, कार्यकर्त्यांना केलं. तेवढे माझे कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत.", असं अजित पवार म्हणाले.  


"माझ्या भाषणाचा काय त्रास होतो? मी काय भाषण करायचं त्यावर तुम्ही टीका टिप्पणी करु नका. मतदारांशी काय बोलायचं तो माझा अधिकार, मी माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं, माझं त्यांच्याशी जिव्हाळ्याचं नातं आहे.", अजित पवारांची शरद पवारांवर नाव न घेता टीका.


ज्यांनी माझी बाजू घेतली, त्यांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये : अजित पवार 


"ज्यांना माझ्यासोबत यायचं आहे, त्यांनी माझ्यासोबतच यावं, ज्यांना दुसऱ्या बाजुला जायचं आहे, त्यांनी तिकडे जावं, माझ्या बाजूनं म्हणजे काय हुकुमशाही आहे का? ज्यांनी माझी बाजू घेतली, त्यांनी दुटप्पी भूमिका घेऊ नका, मेहरबानी करा, खरं जे बोलतो तेच सांगा.", असं अजित पवार म्हणाले. 


अनेक कार्यकर्ते अजुनही दोन्ही बाजूंनी दिसतात, असं विचारताच अजित पवार म्हणाले की, "असू द्यात ना, मी सांगायचं काम केलं आहे, बघु काय फरक दिसतोय का? माझ्या दृष्टीनं जे योग्य वाटतं, ती भूमिका घेण्याची मला मुभा आहे, मला इतरांनी टोकण्याचं कारण नाही." 


खासदाराला निवडणून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी जीवाचं रान केलं : अजित पवार 


"एका खासदारानं जर आपल्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं, तर खूप बरं झालं असतं. एक खासदार एक ते दीड वर्षापूर्वी मला राजीनामा द्यायचा आहे. त्या खासदाराला उमेदवारी मी दिली आहे. त्या खासदाराला निवडणून आणण्यासाठी जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलं आहे. त्यांना खासगीत असं बोलवा, समोरा समोर. आता त्यांचं चाललंय सगळं. पण, त्यांचं मधल्या काळात मतदारसंघात लक्ष नव्हतं, ते मतदारसंघात फिरत नव्हते, त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळचे माझे जे वरिष्ठ आहेत, त्यांनाही सांगितलेलं मी राजीनामा देतोय, मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम होऊ लागला आहे, मी काढलेला एक सिनेमा शिवरायांवर असला तरी, तो चालला नाही. माझ्या एकंदरीत प्रपंचावर, आर्थिक गोष्टींवर परिणाम होतोय, अशाही गोष्टी त्यांनी येऊन सांगितलेल्या.", असं अजित पवार म्हणाले. 


निवडणुका आल्यात ना जवळ, त्यामुळे एक-एक पदयात्रा, कोणाला संघर्षयात्रा सुचतेय : अजित पवार


अजित पवार म्हणाले की, "मी हे कधीच बोलणार नव्हतो, पण आता यांना उत्साह आला आहे, निवडणुका आल्यात ना जवळ. त्यामुळे एक-एक पदयात्रा, कोणाला संघर्षयात्रा सुचतेय. चालायचंच, लोकशाही आहे, लोकशाहीत सर्वांनाच पदयात्रा काढण्याचा अधिकार आहे. मी सुद्धा सहा तालुक्यांमध्ये सांगतो, गेल्या पाच वर्षांत यांची भूमिका होती आणि गेल्या काळात तुम्ही कितीदा त्यांना आपापल्या मतदारसंघात पाहिलं आहे." 


अमोल कोल्हेंविरोधातील उमेदवार निवडून आणणारच : अजित पवार 


"उमेदवारी देत असताना योग्य पद्धतीनं उमेदवारी दिलेली होती. ते वक्ते उत्तम आहेत, वत्कृत्त्व चांगलं आहे, उत्तम कलाकार आहेत, संभाजी महाराजांची भूमिका उत्तम साकारली होती. महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या भूमिकेनं खिळवून ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं. पण काळजी करू नका, त्यांच्याविरोधात दिलेला उमेदवार, मी आज तुला सांगतो की, निवडून आणून दाखवेल.", असं अजित पवार म्हणाले. 


पाहा व्हिडीओ : Ajit Pawar on Amol Kolhe : पाच वर्ष आपल्या मतदार संघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं - अजित पवार