Amol Kolhe on Ajit Pawar: एकत्र पक्ष असताना सगळ्यांचं सहकार्य होतं. आता उगाच ताकाला जाऊन भांडं लपवण्यात अर्थ नाही, आता परिस्थिती बदलली म्हणून खोटं बोलणं, हे माझ्या तत्वात बसत नाही. ही वस्तूस्थिती आहे, असं अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले. तसेच, अजित दादा (Ajit Pawar) मोठे नेते आहेत, काहीतरी मोठ्या नेत्यांनी बोलल्यानंतर त्यांना प्रत्युत्तर देऊन बातम्यांमध्ये येणं, हे मला पटत नाही, असंही अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, "एकत्र पक्ष असताना सगळ्यांचं सहकार्य होतं. आता उगाच ताकाला जाऊन भांडं लपवण्यात अर्थ नाही, आता परिस्थिती बदलली म्हणून खोटं बोलणं, हे माझ्या तत्वात बसत नाही. ही वस्तूस्थिती आहे, या दोघांनीही त्यावेळी 100 टक्के प्रयत्न केले. मी हे नाकारण्याचं काहीच कारण नाही.
दादा मोठे नेते, मी फार लहान कार्यकर्ता, त्यांच्याविषयी बोलणं उचित नाही : अमोल कोल्हे
"दादा मोठे नेते आहेत, इतक्या मोठ्या नेत्याविषयी बोलण्यासाठी मी फार लहान कार्यकर्ता आहे. मी त्यांच्याविषयी काहीच बोलणं उचित ठरणार नाही. ना मी राजकारणातला, ना मला कोणती राजकीय पार्श्वभूमी, ना माझा कारखाना, ना माझी शिक्षण संस्था आहे. काहीतरी मोठ्या नेत्यांनी बोलल्यानंतर त्यांना प्रत्युत्तर देऊन बातम्यांमध्ये येणं, हे मला पटत नाही. मी मला जबाबदारी दिलेली, हे मला महत्त्वाचं वाटतं आणि आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्त्वाखाली, हीसुद्धा अशीच पार पाडीन. यापुढेही शिरुर मतदारसंघातले महत्त्वाचे प्रश्न आहे, ते मार्गी लावण्याचं काम करत राहीन. मला वाटत नाही की, दादांइतक्या मोठ्या नेत्याविषयी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यानं बोलावं हे मला बरोबर वाटत नाही.", असं अमोल कोल्हे म्हणाले.
पाच वर्ष मतदारसंघाकडे पाठ फिरवल्याच्या अजित पवारांच्या आरोपांवर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, "अनेकदा स्वतः अजित पवारांनीही अनेक ठिकाणी भाषणांमध्ये कौतुक केलं आहे. कदाचित त्यांना माहिती देणाऱ्यांनी त्यांना चुकीची माहिती दिली आहे. यामध्ये काहीतरी गैरसमज झाले आहेत. जर काम केलं नसतं, तर कोविड काळात पाच लाख नागरिकांचं लसीकरण करणारा आपला देशातला एकमेव मतदारसंघ आहे. इंद्राणी मेडीसीटीसारखा प्रोजेक्ट शिरुर लोकसभा मतदारसंघात मांडला आहे. छत्रपती संभाजीराजांच्या समाधीस्थळाचा जीर्णोद्धारही करण्यात आला. राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून 30 हजार कोटींचे प्रकल्प शिरुर मतदारसंघात येत आहेत. कामच केलं नसतं, तर हे सगळं आलंच नसतं."
आपण काम करणं जास्त महत्त्वाचं : अमोल कोल्हे
"निवडणूक हे केवळ माध्यम असतं, आपण राजकारणाकडे पाहताना निवडणुकीकडे साध्य म्हणून पाहतो, सत्ता हे केवळ माध्यम आहे. आपण काम करणं जास्त महत्त्वाचं. आपली तत्व, आपली निष्ठा हे सर्व लक्षात ठेवत काम करणं महत्त्वाचं असतं.", असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
जे खासगीत बोललो, ते खासगीत राहू द्या : अमोल कोल्हे
अमोल कोल्हेंनी खासगीत राजीनामा देणार असल्याचं सांगितल्याचं अजित पवार म्हणाले होते. यावर अमोल कोल्हे म्हणाले की, "मला वाटतं विश्वासानं खासगीत सांगण्याच्या काही गोष्टी असतात, त्या खासगीत ठेवण्याचा संकेत असतो. मला वाटतं हा संकेत माझ्याकडून तरी किमान पाळला जावा. त्यामुळे माझं असं काही बोलणं झालं असेल, तर ते खासगीतच राहावं असं मला वाटतं."
काय म्हणालेले अजित पवार?
"एका खासदारानं जर आपल्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं, तर खूप बरं झालं असतं. एक खासदार एक ते दीड वर्षापूर्वी मला राजीनामा द्यायचा आहे. त्या खासदाराला उमेदवारी मी दिली आहे. त्या खासदाराला निवडणून आणण्यासाठी जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलं आहे. त्यांना खासगीत असं बोलवा, समोरा समोर. आता त्यांचं चाललंय सगळं. पण, त्यांचं मधल्या काळात मतदारसंघात लक्ष नव्हतं, ते मतदारसंघात फिरत नव्हते, त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळचे माझे जे वरिष्ठ आहेत, त्यांनाही सांगितलेलं मी राजीनामा देतोय, मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम होऊ लागला आहे, मी काढलेला एक सिनेमा शिवरायांवर असला तरी, तो चालला नाही. माझ्या एकंदरीत प्रपंचावर, आर्थिक गोष्टींवर परिणाम होतोय, अशाही गोष्टी त्यांनी येऊन सांगितलेल्या.", असं अजित पवार म्हणाले.
"उमेदवारी देत असताना योग्य पद्धतीनं उमेदवारी दिलेली होती. ते वक्ते उत्तम आहेत, वत्कृत्त्व चांगलं आहे, उत्तम कलाकार आहेत, संभाजी महाराजांची भूमिका उत्तम साकारली होती. महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या भूमिकेनं खिळवून ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं. पण काळजी करू नका, त्यांच्याविरोधात दिलेला उमेदवार, मी आज तुला सांगतो की, निवडून आणून दाखवेल.", असं अजित पवार म्हणाले.