Sharad Pawar on Narendra Modi, Satara : "डॉ. मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना त्यांच्या 10 वर्षांच्या काळामध्ये 111 वेळा त्यांनी पत्रकारांना निमंत्रण दिलं आणि आपल्या कामाच्या संबंधीचा आढावा हा त्यांच्यासमोर घेतला. मोदींना प्रधानमंत्री होऊन 10 वर्षे झाली. या 10 वर्षांत आजपर्यंत एकदाही पत्रकार परिषद घेणं आणि आपल्या कामाचा लेखाजोखा त्यांच्यासमोर मांडणं हे त्यांनी कधी केलं नाही. कारण त्याच्यावर विश्वासच नाही", असे म्हणत राष्ट्रवादीचे सर्वसर्वो शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi)  टोला लगावलाय. महाविकास आघाडीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ साताऱ्याच्या दहिवडी येथे शरद पवारांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. 


अनेक राजकीय पक्ष असताना सुद्धा हा देश एकसंघ राहिला


शरद पवार म्हणाले, लोकसभेची निवडणूक आली, या निवडणुकीवर देशाचेच नाही तर जगाचे लक्ष आहे. पाच ते सहा दिवसांपूर्वी बारामती मतदारसंघामध्ये प्रचाराचे नारळ फोडल्याची सभा होती. एका कोपऱ्यामध्ये कोणीतरी न माहितीचे गृहस्थ दिसले. मी चौकशी केली, की हे कोण आहेत? तेव्हा मला सांगण्यात आलं त्यांच्याकडून, अमेरिकेमध्ये सर्वात महत्त्वाचं वर्तमानपत्र आहे, त्याचे नाव 'न्यूयॉर्क टाइम्स' त्याचे प्रतिनिधी त्या ठिकाणी माहिती घेण्यासाठी आले होते. सभा संपल्यावर मी त्यांची चौकशी केली,  इतक्या लांब तुम्ही आले कसे? तर त्यांनी सांगितलं, की भारताच्या निवडणुकीसंबंधी जगाचे लक्ष आहे, अमेरिकेचे लक्ष आहे. त्यातल्या त्यात ही निवडणूक संघर्षाची कुठे होत असेल तर ती महाराष्ट्रात होत आहे आणि म्हणून मला माझ्या कंपनीने महाराष्ट्रात जायला सांगितले म्हणून मी आलो.  सांगायचं तात्पर्य हे की, ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची झालेली आहे. त्याचे कारण जगातल्या अनेक देशांनी या देशातील लोकशाही बघितलेली आहे. जवाहरलाल नेहरू असो, इंदिरा गांधी असो, लाल बहादूर शास्त्री असो, नरसिंह राव असो, देवेगौडा असो, किंवा डॉ. मनमोहन सिंग असो. या सगळ्यांच्या कालखंडामध्ये एवढा मोठा देश, अनेक भाषा बोलणारे लोक, अनेक राजकीय पक्ष हे सगळं असताना सुद्धा हा देश एकसंघ राहिला आणि या देशातील निवडणुका पार पडल्या. अनेक लोकांचे सरकार या देशामध्ये आली हा या देशातील लोकशाहीचा विजय आहे आणि त्याबद्दलचं औत्सुक्य जगातल्या अनेक लोकांच्या समोर आहे, असंही शरद पवार यांनी सांगितले. 


काही राष्ट्रीय प्रश्न असतात त्याच्यावर चर्चा करावी लागते


पुढे बोलताना शरद पवार म्हणाले,  यंदाच्या वेळेला स्थिती वेगळी आहे, ती वेगळी का झाली? त्याचे कारण गेले 10 वर्ष या देशाची सत्ता नरेंद्र मोदी नावाच्या गृहस्थाच्या हातात गेली. सत्ता देशाची गेली, अपेक्षा अशी होती भाजपाचा प्रधानमंत्री यापूर्वी या देशाने बघितले होते. मला आठवतंय, मी विरोधी पक्ष नेता होतो पार्लमेंट मध्ये, आणि देशाचे प्राईम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयी होते. अनेक प्रश्नांवर विरोधी पक्ष नेता आणि सत्ताधारी नेता यांना एकत्र बसावं लागतं. काही राष्ट्रीय प्रश्न असतात त्याच्यावर चर्चा करावी लागते आणि एक गोष्ट मान्य करायला पाहिजे की वाजपेयी यांनी त्या काळामध्ये कोणताही महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय किंवा देशाचा प्रश्न आला तर सुसंवाद ठेवण्याची आवश्यकता आहे, पहिल्यांदा कोणाची तर विरोधी पक्षाची, आणि त्यासाठी आम्हा लोकांना ते बोलवत असत, चर्चा करत असत, म्हणणे ऐकून घेत असत आणि योग्य तो निर्णय घेत असत. आजचे प्रधानमंत्री यांचा संवादावर विश्वास नाही, कधी ते विरोधकांशी बोलत नाहीत, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...