Rohit Pawar on Devendra Fadnavis नाशिक : आम्ही बेनामी जाहिरात करत नाही, जे करतो ते खुल्लमखुल्ला करतो. असे म्हणत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या देवा भाऊ जाहिरातीवरून मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. नाशिकमध्ये सुरू असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. यावेळी हातात वृत्तपत्र दाखवत फडणवीसांना रोहित पवारांनी टोला लगावला आहे. यापूर्वी देखील रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तपत्राने राज्यभरात बॅनरच्या माध्यमातून केलेल्या जाहिरातीवरून टीका केली होती. अशातच देवा भाऊंच्या टीकाले आता 'देवा तूच सांग' च्या जाहिरातीने उत्तर देण्यात आल्याची चर्चा आहे.
'देवाभाऊ'च्या जाहीरातील 'देवा तूच सांग'च्या जाहिरातीने प्रत्त्युत्तर
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विविध दैनिकांमध्ये जाहिराती देण्यात आल्या आहेत. या जाहिरातींमध्ये शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, पीक विमा कायदा, कांदा निर्यात बंदी, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये, युवकांना नोकरी आणि असुरक्षित महिला यांसारख्या प्रश्नांवरून सरकारला प्रश्न विचारण्यात आले आहेत. “देवा तूच सांग” असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रश्नांची उत्तरे कधी मिळणार, असा सवाल करण्यात आला आहे. या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी भव्य आक्रोश मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे. उद्या, सोमवारी नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा भव्य आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. लोकमत, सकाळ, दिव्या मराठी, गावकरी, देशजोश यांसारख्या दैनिकांमध्ये या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. हा मोर्चा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काढण्यात येत आहे.
आम्ही स्वयंघोषित देवाला याबाबत बोलत नाही- रोहित पवार
आमच्या पक्षाने दिलेली जाहिरात आहे. आम्ही स्वयंघोषित देवाला याबाबत बोलत नाही. आम्ही आमच्या देवाबाबत विठ्ठलाला साकडे घातले आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यातील आमदाराला सांगण्यात आलं होतं देवाभाऊ जाहिरात लावा. मात्र नाव कुठेच छापलं नव्हतं. आमची जाहिरात बघा आम्ही आमच नाव छापलं आहे. त्यांनी नाव छापलेले नाही. याचा अर्थ मेघा इंजिनियरिंग कंपनीने जाहिरात दिली का? कारण 190 कोटी रुपये त्यांचे माफ झाले आहेत. कोकणात दादांच्या पक्षाच्या नेत्याने जाहिरात लावली आहे. भविष्यात ते त्यांच्या सोबत राहणार नाहीत. महिला आणि बालकल्याण खात्याचा संबंध असू शकतो. कारण दादांच्या पक्षाचे कोकणातील नेते यांची भाजप सोबत जास्त जवळीक झाली आहे. दादांचे पोस्टर कमी देवाभाऊचे पोस्टर त्यांनी जास्त लावले असल्याचा आरोप हि रोहित पवार यांनी केलाय.