Sharad Pawar On Lok Sabha Election : बारामतीमधून माझ्या राजकारणाची सुरूवात झाली, त्यामुळे बारामती मतदारसंघामध्ये आम्हाला चांगलं लीड मिळालं, राज्यात ठाकरे-काँग्रेस आणि आम्ही जीवाभावाप्रमाणे लढलो असं शरद पवारांनी म्हटलं. देशाचा निकाल हा परिवर्तनाला पोषक असून पुढची दिशा ही इंडिया आघाडीच्या बैठकीत होईल असं शरद पवार म्हणाले. लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचं चित्र आहे. त्यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं.

  


शरद पवार काय म्हणाले? 


लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे, हा निकाल परिवर्तनाला पोषक असा आहे. देशाच्या निकालात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची दिसते. आमच्या
पक्षाला चांगले यश मिळालं आहे. आम्ही जनतेची कृतज्ञता व्यक्त करतो. आमचा प्रयत्न राहणार आहे की देशात देखील चित्रं आशादायक आहे. उत्तर प्रदेशात देखील चांगला निकाल लागला आहे. यापूर्वी भाजपला जे यश मिळायचं त्यामध्ये मर्जिन मोठं असायचं. आता तसं चित्रं नाही. 


आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न केले. मी मल्लिकार्जुन खर्गे, सीताराम येचुरी यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. आज संध्याकाळी याबाबत निश्चित आम्हाला कळेल आणि त्यानंतर आम्ही दिल्लीला जाऊ.


आम्ही 7 जागांवर यश प्राप्त करू असं चित्रं आहे. 10 पैकी 7 जागा जिंकण मोठं आहे. आमचा स्ट्रइक रेट जास्त आहे. आम्ही महाविकस आघाडी केली त्यांना देखील यश चांगलं मिळालं. आम्ही जीवाभावाने काम करण्याची भूमीका घेतली त्यामुळं हे घडू शकलं. आम्ही तिघे देखील एकत्रित राहून आगामी निवडणुकीला समोर जाऊ


लोकसभा निवडणूकांचे सर्व निकाल अद्याप हाती आले नसले तरी महाराष्ट्राने परिवर्तनाच्या दिशेने निकाल घेतल्याचे स्पष्ट होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उ.बा. ठा.) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) ह्या महाराष्ट्र विकास आघाडीतील घटकांनी सामूहिकरित्या जनतेपुढे आपली भुमिका मांडली. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून शाहू-फुले-आंबेडकरांचा पुरोगामी विचार पुढे नेणे, लोकशाही मुल्यांचे रक्षण करणे ही ती प्रमुख भुमिका होती. जाती-धर्माच्या वादा पलीकडे जाऊन रोजगार, महागाई यांसारख्या दैनंदिन भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आघाडी कटीबद्ध होती. ह्या भुमिकेचे जनतेने स्वागत केले, सन्मान राखला आणि म.वि.आ. वर विश्वास दाखवला याबद्दल मी महाराष्ट्रातील तमाम जनतेविषयी कृतज्ञता व्यक्त करतो.


राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते श्री. नाना पटोले, श्री. बाळासाहेब थोरात, श्री. पृथ्वीराज चव्हाण आणि शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सहकार्याने महाराष्ट्र विकास आघाडी आपली भूमिका तळागळातील जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न करेल आणि शेवटच्या घटकाच्या हिताची जपणूक करण्यासाठी आम्ही सतत सामूहिक प्रयत्न करू असा शब्द आपणास देतो.


या निवडणूक निकालाने देशातील चित्र देखील बदलले आहे आणि त्यात महाराष्ट्राची प्रमुख भूमिका आहे. याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचा मला अभिमान आहे. देश हिताच्या दृष्टीने इंडिया आघाडी काही पावले टाकत असतील तर महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सामूहिक योगदान देण्यात अग्रभागी राहू.


अतिशय संघर्षपूर्ण झालेल्या ह्या लोकशाही लढ्‌यात महाराष्ट्रातील जनतेने कणखर साथ दिली त्याबद्दल जनतेचे मी पुन्हा ऋण व्यक्त करतो. तसेच महाराष्ट्र विकास आघाडीतील असंख्य कार्यकर्त्यांनी हे यश मिळवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले त्याबद्दल त्यांचे मनः पुर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद !


ही बातमी वाचा: