Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ठाण्यामध्ये मंगळवारी झालेल्या सभेत तलवार दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेची मंगळवारी झालेली उत्तर सभा चांगलीच चर्चेत आहे. राज यांनी या सभेत तलवार दाखवली होती. या प्रकरणी ठाणे येथील नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मनसे नेते अविनाश जाधव आणि रविंद्र मोरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यावर आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नौपाडा पोलीस स्टेशचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, 'आज रोजी नौपाडा पोलीस स्टेशन हद्दीत 12 एप्रिलला गडकरी चौक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित जाहीर सभेदरम्यान अध्यक्ष राज ठाकरे यांनी तलवार दाखवली. या प्रकरणी त्यांच्यावर भा.द.वि कलम 34 सह भारतीय हत्यार कायदा 1959 चे कलम 4 आणि 25 अन्वये अध्यक्ष मनसे राज ठाकरे, ठाणे आणि पालघर जिल्हा मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश अनंत जाधव आणि मनसे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे आणि इतर सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.'
मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी 3 मेपर्यंत मुदत : राज ठाकरे
मशिदींच्या भोंग्याच्या आवाजासंबंधी आपण या आधीही आवाज उठवला होता, अजित पवारांना तो ऐकू आला नाही. असा निशाणा राज ठाकरे यांनी मंगळवारी झालेल्या सभेत साधला. मशिदींवरील भोंग्यासंबंधी सर्व मशिदींना 3 मे पर्यंत मुदत देतो, या नंतर जर कोणी भोंगे काढले नाहीत तर देशभरातील मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्यात येईल असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. भोंग्यांचा आवाज हा बेसूरा असतो, त्यामुळे शांतता बिघडते असं सांगत राज ठाकरे म्हणाले की, "इतरांची शांती बिघडवून तुम्ही तुमचा भोंगे वाजवून प्रार्थना करा असा कोणताही धर्म सांगत नाही. इतरांची शांती भंग होईल अशा कोणत्याही गोष्टीला परवानगी देण्यात येणार नाही असं 18 जुलै 2005 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका सुनावणीत सांगितलं आहे. आता 3 तारखेपर्यंत ऐकला नाही तर देशभरातील मशिदींच्या समोर हनुमान चालीसा लावा."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Sharad Pawar : राज ठाकरेंच्या टीकेवर शरद पवारांचा निशाणा, म्हणाले, त्यांना गांभीर्यानं घेऊ नका...
- Jitendra Awhad : राज ठाकरेंना 'डिम्नेशिया' झाला आहे, ते विसरतात; शरद पवारांवर केलेल्या टीकेवर जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
- शरद पवारांच्याकडे घेण्यासारखे अनेक गुण आहेत..,पण त्यांच्या जातीय राजकारणाचे काय करायचं?: राज ठाकरे
- Raj Thackeray : मशिदींच्या भोंग्यांना 3 मे पर्यंत मुदत, ऐकला नाहीत तर.., राज ठाकरेंचा इशारा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha