Sharad Pawar : रविवारी शिर्डी येथे भाजपचे महाअधिवेशन पार पडले. या अधिवेशनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. शरद पवारांनी दगाफटक्याचे राजकारण केले. तर उद्धव ठाकरे यांनी द्रोह केला, असे म्हणत त्यांनी दोन्ही नेत्यांवर निशाणा साधलाय. आता शरद पवार यांनी अमित शाह यांच्यावर पलटवार केलाय. अमित शाह यांचा तडीपारीचा मुद्दा शरद पवारांनी उकरून काढलाय.
शरद पवार म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यानंतर अत्यंत प्रभावी काम करणारे सरदार पटेल यांचा उल्लेख करायला हवा. राज्यात यशवंतराव चव्हाण यांनी अतिशय मोलाचे काम केले आहे. शेजारील राज्य गुजरात तिथे देखील अनेक महत्वाचे लोक होते. या लोकांना कधी तडीपार करण्यात आलं नव्हतं. देशाच्या गृहमंत्र्यांनी काही विधान केलं. मला वाटतं त्यांनी थोडी माहिती घेऊन बोलायला हवं. 1958 सालापासून मी राजकारणात आहे. 1978 साली हे राजकारणात कुठ होते हे माहिती नाही. मात्र, त्यावेळी मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. मी मुख्यमंत्री असताना उत्तमराव पाटील माझ्यासोबत होते. त्यावेळी वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन यांचा उल्लेख करायला हवा. ते चांगलं काम करत होते. या नेत्यांचा इतर नेत्यांशी सुसंवाद होता. ही कर्तृत्ववान लोकं होती. त्यांनी कधी चुकीचं राजकारण केल नाही. भुजमधे भूकंप झाला त्यावेळी सरकार मधील लोकांची बैठक झाली त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांची एक समिती होती त्यांनी माझ्यावर भूकंप झालेल्या भाग पूर्व स्थितीवर आणण्याची जबाबदारी सोपवली होती, असे त्यांनी म्हटले.
तेव्हा सहकार्यासाठी बाळासाहेबांकडे गेले
ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंबाबत जी भूमिका घेतली ती लोकांनी पाहिली आहे. उद्धव ठाकरे सुद्धा त्यावर कधी तरी त्यांचे मत सांगतील. मला हे माहीत आहे, जेव्हा हे गृहस्थ गुजरातमध्ये राहू शकत नव्हते, अन् त्यांना मुंबईत आसरा देण्यात आला होता. तेव्हा बाळासाहेबांच्या घरी जाऊन सहकार्य करावं, अशी विनंती त्यांनी केली होती. याची माहिती माझ्यापेक्षा उद्धव ठाकरे सांगतील, असे गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला आहे. पण दुर्देवाने पातळी घसरली किती हे सांगायला ही पुरेशी विधानं आहेत. अशा व्यक्तीने जी विधाने केली त्याची नोंद पक्षात किती घेतली, हे न सांगितलेलं बरं, असेही त्यांनी म्हटले आहे.
पवारांचा अमित शाहांना टोला
आम्ही भाजप सोबत कोणतीही कमिटमेंट केली नव्हती. माझी अहमदाबाद येथे एक बैठक होती. बँकेच्या संदर्भात एक बैठक होती तिथ भेट झाली होती. त्यानंतर मी कधीही त्यांना भेटलो नाही. मला टीका जिव्हारी लागली नाही. संबंधित व्यक्तीची नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, असा टोला देखील शरद पवार यांनी अमित शाह यांना लगावला.
ठाकरे गटाच्या स्वबळाच्या नाऱ्यावर काय म्हणाले शरद पवार?
शिवसेना ठाकरे गटाने महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय. याबाबत देखील शरद पवार यांनी भाष्य केले आहे. त्यांनी म्हटलंय की, इंडिया अलायन्स म्हणून आम्ही राष्ट्रीय पातळीवर एकत्रित लढावे हे ठरले होते. त्यात यश आल्यावर आम्ही राज्यात एकत्र लढलो. पण पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका एकत्र लढाव्या, याबाबत कोणतीच चर्चा झाली नव्हती. पण राज्यापुरते बोलायचे झाले तर राज्य पातळीवर आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन येत्या 8-10 दिवसात बैठक घेऊ, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला